पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी: विशाल महाराज खोले

श्री क्षेत्र आळंदी दि . २० – ज्याप्रमाणे नाले , ओढे, नद्या सागराला जावून मिळतात व सागररुप होतात . तद्वत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निघालेला विठ्ठल भक्तीचा प्रवाह हा भक्तीसागर असलेल्या भूवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरीत चंद्रभागेत विलीन होतो. जो विठ्ठलभक्तीत विलीन झाला त्याला पुन्हा जन्ममरणाची भीती नाही. ” पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी “हे संत वचन आहे आणि हेच आठव्या अध्यायाचे सार आहे असे मत ह. भ. प. विशाल महाराज खोले यांनी व्यक्त केले .
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्रीक्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( शनिवार ) आठव्या दिवशी कु-हा – मुक्ताईनगर ( जि. जळगाव ) येथील विशाल महाराज खोले यांनी ब्रम्हाक्षरनिर्देशयोग या आठव्या अध्यायावर निरुपण केले .

म्हणोनि तूप होऊनी माघौतें l
जेवीं दूधपणा न येचि निरुतें l
तेवि पावोनियां जयातेंl
पुनरावृत्ती नाहीं ll

खोले महाराज या अध्यायाचे निरुपण करताना म्हणाले , माउलींनी या अध्यायात ब्रम्हाक्षरनिर्देशयोग विस्तृतपणे सांगितला आहे . माऊली सांगतात ज्याचे आकारावाचून अस्तित्व आहे. ज्याला जन्मही नाही आणि अंतही नाही . जे सर्वस्वरुप आहे . जे आकाशापेक्षा पुरातन व परमाणूपेक्षा लहान आहे असा परमात्मा म्हणजे श्री विठ्ठल आहे . जो सुक्ष्म व्यापक आणि जगात असून नष्ट होत नाही त्याला ब्रम्ह म्हणतात .
जो देहाच्या उत्पत्ती नाशा मुळे उत्पन्न किवा नष्ट होत नाही असा देह्स्थ कूटस्त आत्मा अध्यात्म आहे. असंग अव्यक्त ब्रम्हाचे ठिकाणी जगदाकार उत्पन्न होणारा जो व्यापार त्यालाच कर्म म्हणतात. उत्पत्ती, विनाश , वाण भौतिक शरीर अधिभूत आहे. जो देहात कर्ता , भोक्ता , दृष्टा या स्वरुपात आहे जो वस्तुतः परमात्मच पण अहंकाराने कार्यकारण उपाधिमुळे तोच जीव अधिदैव आहे . देहभावाचा नाश करणारा जो साधनप्रयोग आहे त्याला अधियज्ञ म्हणतात . मरणकाळी कोणता मार्ग प्राप्त होईल हे माणसाच्या स्वाधीन नसल्याने हे सर्व अनिश्चित आहे . परंतु जो माझे नामस्मरण करतो , माझी सेवा करतो . जे अखंडपणे अंत:करणपूर्वक माझ्याशी एकरुप झाले आहेत . त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्याचा सेवक होतो . देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो अशी ज्याची स्थिती झाली आहे तोच केवळ ब्रम्हरुप स्थानाला प्राप्त होतो . या कार्यक्रमाचे निवेदन ह.भ. प. स्वामीराज भिसे यांनी केले .

उद्या रविवार दि . २१ रोजी आळंदी ( जि. पुणे ) येथील लक्ष्मण महाराज शास्त्री हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या राजविद्याराजगृह्ययोग या नवव्या अध्यायावर निरुपण करतील .

दरम्यान आज ( शनिवार ) श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांचे हस्ते करण्यात आली . या पुजेचे पौरोहित्य यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी केले . माउलींसमोर गुरुजीबुवा राशिनकर यांच्या वतीने कीर्तनाची तर डांगे , फरताळे व फाळके यांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!