पंढरीत रंगोत्सवाची धूम..
पंढरपूर – पंढरपूर शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली . कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी पंढरपूरकरांनी हा सण परंपरेप्रमाणे साजरा केला. सकाळी लवकर येथील यमाई तलावावर नैसर्गिक रंगांची उधळण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
पंढरपूरची रंगपंचमी ही खूप प्रसिध्द आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात देखील हा सण साजरा केला जातो. प्रतिवर्षी मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात रंग पंचमी खेळली जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसचे संकट पाहता श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने रंगपंचमी दिवशी रंगाची उधळण न करता केवळ पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढून देवाला शास्त्रास अनुसरून नैसर्गिक रंग लावून साधेपणाने हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला.
मात्र पंढरपूर शहरात अन्यत्र रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला गेला. येथील यमाई तलाव, तुळशी वृंदावन येथे श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते पूजन केले गेले. यानंतर रंगपंचमी साजरी झाली.
यासाठी कोरडे नैसर्गिक रंग वापरले गेले. गेली काही वर्षे यमाई तलावावर फिरावयास येणार्या नागरिकांकडून हा सण साजरा केला जातो. यास आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात सहभागी होण्यासाठी नागरिक येथे कुटूंबासह येतात. यामुळे रंगपंचमीला येथे महिला, मुली, लहान मुले, वृध्द ही सहभागी होताना दिसतात. सकाळी येथे डीजेच्या तालावर अनेकांनी ठेका धरला होता.
हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यमाई तलाव वॉकिंग ग्रुपचे राजू कपडेकर, सुनील उंंबरे, पांडुरंग घंटी, राजू उराडे, बाबू मोरे, रवी भिंगे, सुनील येळे, महेश उंबरे, गोटू जोशी, सुहास ईचगावकर, अभय जोशी, महेश खिस्ते, संजय कौलगी यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान पंढरपूर शहरात रंगपंचमीला दुपारपासून सुरूवात झाली. तरूणांमध्ये याचा उत्साह जास्त दिसत होता. दुपारी उशिरापर्यंत रंगांची उधळण सुरू होती.