पंतांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व सहकाराची मोठी हानी
प्रशांत आराध्ये
पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व सहकारात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सुधाकरपंत परिचारक यांनी काम केले असून अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. वयाच्या 84 वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला असला तरी ते अंतिम क्षणाबरोबर कार्यमग्नच राहिले. दुष्काळी सोलापूर जिल्ह्याला सहकारात अग्रेसर करण्यात पंतांची मोठी भूमिका असून अनेक नेत्यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सहकारी साखर कारखानदारीत एक एक पाऊल पुढे टाकले. सर्वाधिक संस्थांचे जाळे ज्या काळात या सोलापूर जिल्ह्यात विणले गेले त्यात पंतांनी मोलाची कामगिरी आहे. अनेक नेतृत्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली आहेत. आज त्यांच्या जाण्याने सहकार व राजकारणाची मोठी हानी झाली आहे.
राजकारणातील सालस व शांत ,संयमी नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण म्हणजे सुधाकरपंत परिचारक होय. त्यांनी राजकारणात कधीही अताताईपणाने निर्णय घेतले नाहीत. याच त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांमध्ये सहज मिसळून जायचे. विधानसभेत पंचवीस वर्षे सलग ते काम करत होते. पंढरपूर मतदारसंघात पाच वेळा ते विजयी झाले. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. पंतांनी राजकारणात काम करताना सवंग लोकप्रियतेसाठी कधीही ही खोटी आश्वासन दिली नाहीत. आश्वासक राजकारणाची कास धरली. जे करता येणे शक्य आहे त्यावरच ते बोलायचे. यामुळे काही लोक नाराज व्हायचे मात्र नंतर त्यांना पंतांची भूमिका पटायची. याच जोरावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात ..बोले तैसा चाले..अशा नेत्याची प्रतिमा तयार केली.
(पंढरपूरमध्ये अर्बन बँकेच्या कार्यक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले होते. त्यांच्या समवेत सुधाकरपंत परिचारक)
सुधाकरपंत परिचारक यांनी आपले कार्य पन्नास वर्षापूर्वी सुरू केले. ते परिचारक या पंढरपूरमधील नामांकित घराण्यातील होते. याच बरोबर ते विठ्ठलाच्या सेवाधारी कुटुंबातील. यामुळे वारकरी संप्रदायाचा त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांना या संप्रदायाने कायम मान दिला. वारकर्यांच्या प्रश्नावर नेहमीच पंत आवाज उठवित आले होते. संत सीताराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या खर्डी हे पंतांचे मूळ गाव. परिचारक कुटूंब हे सात्विक व आध्यात्मिक असून अनेक संतांचे आशीर्वाद त्यांना लाभले आहेत. यामुळेच पंतांनी आपल्या कामगिरीने राजकारणातील संत अशी उपाधी मिळविली होती. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी रोज प्रदक्षिणा मार्गावरील वाड्यात लोक येत असत. तसेच पंत जेथे जात तेथे लोक त्यांच्या पायावर डोके ठेवण्यात धन्यता मानत. ही श्रध्दा व विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून मिळविला होता. असे व्यक्तिमत्व राजकारणात दुर्मीळच म्हणावे लागणार आहे.
पंतांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व सहकारात स्व. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप, कि. रा. मर्दा उर्फ मारवाडी वकील, रतनचंद शहा, बाबूरावआण्णा अनगरकर, भाई एस.एम. पाटील यांच्याबरोबर काम केले आहे. अलिकडच्या काळात पंत हे जिल्ह्याच्या राजकारण व सहकारात मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. राजकीय पक्ष कोणतेही असले तरी येथील ज्येष्ठ नेत्यांची सहकारातील ऐकी ही वाखण्ण्याजोगी होती. यात पंतांची भूमिका महत्वाची होती. शेकापचे ज्येष्ठ नेेते भाई गणपतराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे यांच्यासह अनेकांबरोबर पंतांनी जिल्ह्याच्या सहकाराला आकार दिला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली येथे नवी पिढी राजकारणात तयार झाली.
सोलापूर हा सर्वात दुष्काळी जिल्हा मात्र उजनी, नीराच्या पाण्याने सर्वाधिक साखर कारखानदारी याच भागात फुलली आणि यासाठी सहकार चळवळ पंतांनी येथे उभी केली. श्रीपूरचा खासगी कारखाना विकत घेवून तो सहकारी केला व आज सर्वाधिक पुरस्कारप्राप्त संस्था म्हणून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. त्यांनी तालुक्याचे बंधन न पाळता माळशिरस तालुक्यात पांडुरंग तर मोहोळ तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखान्याला उर्जित अवस्थेत आणले. जिल्हा दूध संघ असो की सहकारी बँका पंतांनी नेहमीच काटेकोरपणे कारभार करण्यावर भर दिला. त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक हे घडले आहेत.
पंतांनी राजकारणात टोकाचा विरोध कधी ही कोणाला केला नाही. अनेकदा त्यांनी पक्ष सोडण्याचे निर्णय घेतले मात्र यात स्वःताला काही मिळावे हा हेतू नव्हता. प्रवाहाबरोबर राहून जनतेची काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. 1978 ला पराभूत झाल्यानंतर पंतांनी 1985 ला पहिल्यांदा काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश केला. यानंतर सलग पाच निवडणुका ते विजयी झाले. 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर पंतांनी पवार यांची साथ केली. अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधून त्यांनी जिल्ह्यात पक्षासाठी काम केले. देशाच्या राजकारणातील मोठे नेते शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध राहिले. पवार पंढरपूरला आल्यावर नेहमीच पंतांच्या निवासस्थानी जात. राजकारणात मत वेगवेगळी असली तरी पंतांनी कधी याचा परिणाम आपल्या वैयक्तिक संबंधावर होवू दिला नाही.
(राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंढरीत आले असता परिचारकांच्या निवासस्थानी यांच्यासमवेत सुधाकरपंत परिचारक)
2009 ला त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंढरपूरची जागा सोडली. आपली विधानसभेची जागा स्वपक्षीय नेत्यासाठी सोडण्याचा त्यांचा निर्णय धाडसी होता. यानंतर बरीच स्थित्यंतर घडली , घटना घडल्या. पंत शांत राहिले. 2015 ला प्रशांत परिचारक यांना विधानपरिषदेचे आमदार करताना जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मदत केल्याचे दिसून आले आहे. महायुतीकडे संख्याबळ नसताना प्रशांत परिचारक यांना विक्रमी मतं मिळाली होती. यावरूनच पंतांचे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात असणारे संबंध लक्षात येतात. आजवर पंतांनी प्रत्येक नेत्याला आपआपल्या भागात उभे करण्यासाठी खूप मदत केली. त्यांनी टाकलेला शब्द कोणीही खाली पडू दिला नाही हे निकालावरून दिसून आले होते.
पंत जरी महायुतीबरोबर काम करत असले तरी त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी जे संबंध होते ते कायम होते. यासाठी त्यांना भेटण्यासाठी अनेकजण येत अथवा पंत त्यांच्या भेटीला विश्रामगृहात येत. जिल्ह्यात आज नवी फळी जी राजकारणात आहे यातील अनेकांचे पंत मार्गदर्शक होते. आज त्यांच्या जाण्याने सहकाराबरोबरच राजकारणाची ही मोठी हानी झाली असून जिल्ह्यात न भरून येण्यासारखी पोकळी निर्माण झाली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्साहाने उतरलेल्या पंतांना सार्या राज्याने पाहिले आहे. यानंतर ही त्यांचे कामकाज सुरूच होते. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ते काम करत राहिले. या कारखान्याने नुकताच पोळा सणासाठी दोनशे रूपये प्रतिटन ऊसबिलाचा हप्ता जाहीर केला होता. शेतकर्यांचा सतत विचार करत पंतांनी काम केले. यामुळेच ते अनेकांसाठी श्रध्दास्थान होते. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यात व बाहेर अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या पांडुरंग परिवाराचे ते दैवत, कुटूंबप्रमुख होते. आज त्यांच्या निधनाने पांडुरंग परिवाराची ही मोठी हानी झाली असून पंतांच्या निधनाने परिचारकप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
(पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यक्रमात साहित्यिक द.मा. मिरासदार, ह.भ.प.बाबामहाराज सातारकर व सुधाकरपंत परिचारक)