पंढरपूर– राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी भोसे येथे पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून काहीही अडचण आली अथवा मदत लागली तर कधीही फोन करा अशी ग्वाही कै. राजूबापू पाटील यांचे बंधू शेखर पाटील व बापूंचे सुपूत्र गणेश पाटील यांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे मागील महिन्यात कोरोना आजाराने निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार 29 सप्टेंबर रोजी पंढरपूर तालुका दौऱ्यावर आले आहेत. भोसे येथे शरद पवार यांनी कै.राजूबापू पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेतली. भोसे येथील पाटील घराणे व पवार यांचे अनेक वर्षाचे संबंध आहेत. कै. यशवंतभाऊ पाटील यांनी पवार यांना अखेरपर्यंत साथ दिली होती तर त्यांचे चिरंजीवर राजूबापू पाटील हे देखील पवार समर्थक होते. बापूंचे नुकतेच निधन झाले आहे.
यावेळी शरद पवार यांच्या सोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, मोहोळचे आममदार यशवन्त माने, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरउपस्थित होते. भोसे येथे आल्यानंतर शरद पवार यांनी कै. राजूबापू पाटील, कै. महेश पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर राजूबापूंचे बंधू शेखर पाटील, बापूंचे सुपूत्र गणेश पाटील यांची तसेच घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पाटील यांनी सुरू केलेल्या साखर कारखान्याची माहिती घेतली. तसेच काही अडचण आल्यास कधी या भेटा, फोन करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अशी ग्वाही देत पवार यांनी कै. यशवंतभाऊ पाटील व कै.राजूबापू पाटील यांनी सुरू केले कार्य पुढे न्या असे शेखर पाटील व गणेश पाटील यांना सांगितले.