पवारांसाठी देशाचे राजकारण मोठे की माढ्याचं ?

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. यंदा भाजपाच्या म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. राज्यात जी शिवसेना भाजपाच्या बरोबर सत्तेत सहभागी आहे, आणि ती देखील सतत कमळाला धक्के देत आहे. देशभरात मोदी हटावचा नारा दिला जात असून प्रत्येक राज्यातील विरोधातील प्रमुख नेते आपआपल्या भागात जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. महाराष्ट्रात प्रमुख विरोधक असणारे काँगे्रस व राष्ट्रवादी यांची आघाडी अगोदरच झाली आहे. आता ते मित्रपक्षांना बरोबर घेवून जागा वाटपाचा प्रश्‍न सोडवित असतानाच राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार हे माढ्यातून लोकसभा लढविणार असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. परंतु देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका वठविण्याची तयारी करणारे पवार साहेब एकाच मतदारसंघात आडकून पडणार की सर्वाधिक उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक भागात लक्ष देणार ? हा मोठा प्रश्‍न आहे.
शरद पवार हे राजकारणातील असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या मनात काय चालू असते याची थांगपत्ता कोणालाच लागत नाही. 2014 पूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला व राज्यसभेवर निवडून गेले. यानंतर मोदी लाट राज्यात आली आणि सार्‍याच राजकीय पक्षांचे नुकसान झाले. या मोदी लाटेत 2014 ला पश्‍चिम महाराष्ट्रात पवारांनी चार लोकसभेच्या जागा जिंकण्यात यश मिळविले होते. ज्या चार जागा जिंकल्या यात राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराचे वैयक्तिक श्रेय आहे हे मानावेच लागणार आहे. कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, सातार्‍यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील व बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी आपले मतदारसंघ राखले होते. काँगे्रस सारख्या पक्षाला ही केवळ दोन जागांवर राज्यात समाधान मानावे लागले. यात हिंगोली व नांदेडचा समावेश आहे.
आता 2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. ममता दिदीच्या कोलकता रॅलीत ही त्यांनी सहभाग घेतला. काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचे मार्गदर्शन आधुनमधून होत असते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेनंतर जेडीएस व काँगे्रस याच्या गठबंधनात ही त्यांची भूमिका होती अशी चर्चा होती. अशा स्थितीत पवार साहेबांनी आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आणाव्यात अशी अपेक्षा अनेकांची आहे. परंतु त्यांचे नाव आता माढा लोकसभा मतदारसंघासाठी घेतले जात आहे. सांगोल्यात झालेल्या दुष्काळी परिषदेत पवार यांनीच उमेदवारी घ्यावी अशी जाहीर मागणी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शेकापचे आमदारद्वय गणपतराव देशमुख, जयंतराव पाटील तसेच राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली. तत्पूर्वी पुण्याच्या बैठकीत ही याच विषयावर चर्चा रंगली होती ज्यात पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते होते. म्हणजे पवारांच्या उमेदवारीवरून पक्षात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत हे तरी स्पष्ट होते.
शरद पवार यांनी दोन दिवसात उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट करू असे जाहीर केले होते. ते दोन दिवस संपले आहेत. परंतु त्यांचे नाव माढ्याच्या उमेदवारीसाठी पुढे आल्यानंतर आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. 2009 ते 2014 या काळात पवार यांनी मतदारसंघाचा किती विकास केला ? याची आता उजळणी सुरू झाली आहे. त्यांनी दिलेली आश्‍वासन पाळली की नाहीत ? यावर विचारमंथन सुरू झाले आहे.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँगे्रसच्या अंतर्गत जोरदार गटबाजी आहे हे कोणीही नाकारणार नाही. यावर शरद पवार उपाय शोधतील असा कयास होता मात्र यासाठी येथील उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे आणण्याचा उपाय शोधला जाईल असे वाटत नव्हते. सध्या राज्यात व केंद्रातील भाजपा सरकार हे ताकदवान असून त्यांनी मागील साडेचार वर्षात जोरदार तयारी केली आहे. कितीही त्यांच्याबाबत विरोधी वातावरण दिसत असले तरी महापालिका, नगरपरिषदा तसेच अनेक ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी चांगले यश मिळविले आहे. राज्यात 122 विधानसभेच्या जागा जिंकण्याचा पराक्रम ही भाजपाच्या नावावर जातो. 1995 पासून एवढ्या जागा एकाच पक्षाने मिळविण्याची ही पहिलीच वेळ होती. या पक्षाकडे आकर्षित होणार्‍यांची संख्या ही जास्त आहे हे पाहता राष्ट्रवादीने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी शरद पवार यांचे राज्यभरात जास्तीत जास्त दौरे घडविणे गरजेचे आहे. पन्नास वर्षाहून अधिक राजकारणाचा अनुभव गाठीशी असणार्‍या पवार साहेबांना राज्यातील प्रत्येक भागाची माहिती आहे. याचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे.
भारतीय जनता पक्ष आक्रमक असून त्यांनी राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. बारामतीमध्ये सुध्दा कमळ फुलविण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मागील निवडणुकीत बारामतीची जागा राष्ट्रवादीने जिंकली असली तरी मताधिक्क्य हे कमी होते. अशीच अवस्था माढ्यात ही होती. 2009 ला पवार यांनी माढ्यातून 3 लाख 16 हजार मतांच्या फरकाने विजय संपादित केला होता तर मागील निवडणुकीत मतांचा फरक केवळ 25 हजार होता. पण मोदी लाटेत राज्यातील अन्यत्र भागाची स्थिती पाहता हा विजय राष्ट्रवादीसाठी महत्वाचा ठरला. आता नवमतदारांची संख्या वाढली आहे. केंद्राच्या व राज्याच्या निवडणुकीतील विषय वेगवेगळे आहेत. मतदार उघडपणे बोलत नसला तरी तो मतदानकेंद्रात आपली चोख भूमिका पार पाडतो हे आजवर अनेकदा सिध्द झाले आहे.
ज्यावेळी देशात मोदी विरोधकांची एकजूट होत आहे, त्यावेळी शरद पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांचा राजकीय अनुभव व सर्व पक्षांत असणारे संबंध पाहता पवारांनी माढ्यात गुंतण्याऐवजी राज्यात, देशात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ही अनेकांची आहे. पवार जर माढ्यात निवडणुकीसाठी उतरले तर त्यांचे विरोधक त्यांना येथेच गुंतून ठेवण्यासाठी याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करतील. याची शक्यता ही नाकारता येत नाही.
खासदार शरद पवार यांनी ही अद्याप आपला माढा लोकसभा मतदारसंघाबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. येत्या काही दिवसात ते आपली भूमिका स्पष्ट करतील असे दिसते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत व त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस असल्याने ते पुन्हा लोकसभा लढणार नाहीत असा अंदाज काही राजकीय विश्‍लेषकांचा आहे..मात्र पुन्हा तोच मुद्दा फिरून फिरून पुढे येतो की पवार कधी काय करतील ? याचा नेम नाही. सध्या तरी त्यांनी काही दिवस आपल्या नावाभोवती माढ्याचे राजकारण फिरवत ठेवण्यात यश मिळविले आहे. कदाचित उद्या ते मीच उभा आहे असे समजून..अमूक अमूक याचा प्रचार करा असा आदेश ही देतील. परंतु यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!