पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू, मंंदिर आकर्षक फुलांनी सजविले
पंढरपूर, – राज्य सरकारच्या निर्णयानुसार येथील विठ्ठल रक्मिणी मातेचे मंदिर जवळपास आठ महिन्यांनी आाज सोमवार (दि. 16) दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक करण्यात आली असून दिवसभरात एक हजार भाविकांना दर्शन यामुळे मिळू शकणार आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधक आरोग्य विषयक सर्व नियम पाळले जात आहे. दरम्यान पाडव्या दिवशी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर झेंडू, ऑरकेट, गुलाब व कामिनी या फुलांनी सजविण्यात आले आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर भाविकांना मुखदर्शनासाठी उघडण्यात आले असून या सणानिमित्त शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील दिघी गावचे विभागप्रमुख संतोष तानाजी वाळके यांच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. चार प्रकारची फुले यासाठी वापरण्यात आली असून ही सजावट मंदिरे समितीच्या कर्मचार्यांनी केली आहे.
सोमवारी सकाळी लॉनलाइन दर्शन बुकिंग केलेल्या भक्तांना मंदिरात आरोग्यविषयक तपासण्या करून सोडण्यात आले.
पंढरपूर हे देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी प्रसिध्द असले तरी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रायोगिकतत्वावर सुरुवातीला दिवसभरात केवळ दहा तासच भाविकांना दर्शन दिले जाणार असून याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. रोज यामुळे एक हजार भाविकांना विठ्ठल रूखुमाईचे दर्शन मिळेल. यासाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करणे गरजेचे आहे. दर्शनासाठी 65 वर्षावरील वृध्द तसेच दहा वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला व आजारी व्यक्तींना दर्शनाची परवानगी देण्यात आलेली नाही. दर्शनाला येणार्या भाविकांना कोविड 19 बाबतचे सर्व नियम पाळावे लागणार असून मास्क तसेच दर्शनाला जाताना हाताला सॅनिटायझर लावणे व दोन भाविकांमध्ये सहा फूट अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मंदिर दर्शनासाठी सुरू होत असताना मंदिरे समितीच्या वतीने सुरक्षा, वैद्यकीय सुविधा व सूचना प्रसारण व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अन्नछत्र व प्रसाद व्यवस्था बंद ठेवण्यात आलेली आहे. मुखदर्शनासाठी कासारघाट येथे दर्शनपासाची तपासणी होत असून व यानंतर स्कायवॉकवरून दर्शनमंडप पूर्व गेट सुरक्षा तपासणी तसेच थर्मल स्क्रिनिंग, शरीरातील ऑक्सिजन पातळी या आरोग्य विषयक तपासण्या केल्या जात आहेत. येथे आजाराची लक्षण असणार्यांचा मंदिर प्रवेश रोखला जाणार आहे व त्यांना पुढे सोडले जाणार नाही. येथून मास्क असल्याची खात्री व सॅनिटायझर हाताला लावून दर्शनासाठी सोडले जाते. कान्होपात्रा माळवद ते गरूड खांब ते सोळखांबी या मार्गाने श्री विठ्ठलाचे मुखदर्शन भाविकांना मिळत आहे तर माता रूक्मिणीच्या मुखदर्शनासाठी लक्ष चौर्यांऐंशी शेजारील दरवाज्यातून रूक्मिणी सभामंडपात भाविकांना जाता येते. तेथून दर्शन घेवून व्हीआयपी गेटमधून ते मंदिराबाहेर पडत आहेत. दर्शनरांगेत सामाजिक अंतरासाठी जागोजागी सहा फूट अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे.