पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३ : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वंयसेवी संस्थांना प्रेरणा मिळावी या उद्देशांने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार सन २०१५-२०१६,२०१६-२०१७, २०१७-२०१८ व २०१९-२०२० (राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय) मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी अर्ज प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वंयसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या कार्याने प्रभावित होऊन इतर समाज सेविका व संस्थांना प्रेरणा मिळावी. या उद्देशांने महाराष्ट्र शासनांकडून सन-१९९६-९७ पासून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वंयसेवी संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते.
राज्यस्तरावर महिला समाज सेविकेसाठी प्रत्येक वर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरावर रोख रुपये-१,००,००१/- स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ जिल्हास्तरावर रोख रुपये-१०,००१/- स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ आणि स्वयंसेवी संस्था महसूल विभागासाठी एक या प्रमाणे विभागस्तरावर रोख रुपये-२५,००१/- स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यस्तरीय पुरस्काराकरीता महिला व बाल विकास क्षेत्रात किमान २५ वर्षाचा सामाजिक अनुभव. विभागस्तर पुरस्काराकरीता महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ७ वर्ष आणि जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्षाचा अनुभव पुरस्कार व्यक्तीस/ संस्थेस असणे आवश्यक आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार सन २०१५-२०१६,२०१६-२०१७,२०१७-२०१८ व २०१९-२०२० (राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय) मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय प्रशासकिय इमारत, १ ला टप्पा, 2 रा मजला. आर.सी.मार्ग चेंबुर-71 दूरध्वनी क्रमांक-022-25232308 येथे संपर्क साधावा, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.