प्रक्षाळपूजा प्रकरणाची होणार सखोल चौकशी, संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना विठ्ठल व रूक्मिणी गाभारा बंदी
पंढरपूर, दि.21- आषाढी एकादशीनंतर 9 जुलै रोजी देवाचे सर्व नित्योपचार सुरू करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली होती. मात्र पूजेदरम्यान श्री विठ्ठलाच्या गाभार्यातच समिती अधिकार्याच्या अंगावर पाणी टाकून स्नान घालण्याचा प्रकार घडला. यानंतर यावर राज्यभरातून नाराजीचा सूर उमटला होता . आता श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर नोंद घेत या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच चौकशी पूर्ण होईतोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना देवाच्या गाभार्यात जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
मंदिरे समितीचे कामकाज सुरळीत सुरू रहावे यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात कामासाठी उपस्थित राहू शकतात असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. आज मंदिर समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. यास सदस्य शकुंतला नडगिरे, अॅड. माधवी निगडे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजीराजे शिंदे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे, शिवाजीराव मोरे, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीत 9 जुलै रोजीच्या प्रक्षाळपूजे दरम्यान घडलेल्या अधिकारी स्नानावर चर्चा झाली. ही पूजा रूढी व परंपरेनुसार झाली की नाही यावर विचारमंथन करण्यात आले. आता याची सखोल चौकशी केली जाणार असून पूजेसाठी उपस्थित असणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.