फडणवीसांची साथ सोडणे महाआघाडीला परवडेल…?

माढ्यातून राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे उमेदवार असण्याची दाट शक्यता असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मागील पाच वर्षात महत्वाची भूमिका पार पाडणार्‍या भाजपा प्रणित महाआघाडीची माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघात भूमिका काय असणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ही आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ करणार की पूर्वाश्रमीचे गॉडफादर असणार्‍या ज्येष्ठ नेत्यांकडे ओढली जाणार ..यावर आता मंथन होत आहे. दरम्यान प्रतिकूल परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीला बळ दिले आहे. 2019 च्या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या लोकसभा निवडणुकीत जर स्वकीय मानून सतत मदत केलेल्यांकडून दगाफटका झाला तर यानंतर उमटणारे राजकीय पडसाद ही तीव्र असतील अशी भाजपाच्या गोटात चर्चा रंगत आहे.
2019 मध्ये शरद पवार हे पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी कल्पना कोणीच केली नव्हती. 2009 ला त्यांनी येथून विजय मिळविला होता व 2014 ला पुन्हा लोकसभा न लढविण्याचा निर्धार केला होता. सध्याची राजकीय स्थिती पाहता पवार यांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांच्या उमेदवारीचे पडसाद हे केवळ राष्ट्रवादी व मित्रपक्षांमध्येच उमटले असे नाहीत तर विरोधी आघाड्यात ही यामुळे अनेक घडामोडी घडणार आहेत.
राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर ज्या पश्‍चिम महाराष्ट्रात या पक्षाला लोकसभा व विधानसभेच्या कमी जागा मिळाल्या आहेत तेथे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सुरूवातीला सोलापूर जिल्ह्याचे काम महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पाहत होते मात्र नंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच येथे लक्ष घातले. विधानपरिषदेच्या जागेवर प्रशांत परिचारक यांना भाजपा सहयोगी सदस्य म्हणून उमेदवारी दिली व ते विजयी झाले. यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत महाआघाडीची स्थापना करून सत्ता मिळविली. संजय शिंदे हे अध्यक्ष झाले. नगरपरिषदा व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या काळात भाजपा व सहयोगी सदस्यांना चांगले यश मिळाले. भाजपाच्या सत्ता काळात परिचारक व शिंदे यांच्याकडे जिल्ह्यातील महाआघाडीचे नेतृत्व राहिले आहे.
महाआघाडीतील बरेच नेते हे विधानसभेची तयारी करीत आहेत. यातील काहींनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तर काहींनी सहयोगी सदस्य राहण्यातच धन्यता मानली. आता अचानकच 2019 च्या लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून शरद पवार यांचे नाव पुढे आले आणि महाआघाडीच्या भूमिकेबाबत चर्चा रंगू लागली आहे.
महाआघाडीतील बहुतांश नेते हे शरद पवार यांना मानणारे आहेत. पूर्वाश्रमी हे राष्ट्रवादीशी निगडीत होते नव्हे तर पवार यांच्या किचन कॅबिनेटमधील ते मानले जात. 2014 च्या विधानसभेला परिचारक व शिंदे यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत महायुतीकडून निवडणूक लढविली व राज्यात भाजपा शिवसेनेची सत्ता आल्यावर त्यांच्याबरोबर राहणे पसंत केले व याकाळात भाजपात न जाता महाआघाडी स्थापन केली. याच काळात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत असोत की माळशिरस उत्तम जानकर यांनी मात्र भाजपात अधिकृत प्रवेश केला होता.
शरद पवार यांचे सर्वच पक्षात मित्र असतात हे नवीन नाही. आता ही ते माढ्यातून उभारणार हे चित्र स्पष्ट होत असतानाच महाआघाडीतील नेत्यांच्या ही हालचाली सुरू झाल्या आहेत. पंढरपूरमध्ये महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली ज्यास शिंदे, परिचारक याच्यासह उत्तम जानकर , शहाजीबापू पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. याचा तपशील जरी बाहेर कळला नाही तरी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघांविषयीच यात चर्चा झाली असणार हे निश्‍चित आहे. या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची यावर सध्या या महाआघाडीचे विचारमंथन सुरू आहे.
मोहिते पाटील यांना विरोध करणार्‍यांची सर्वाधिक संख्या महाआघाडीत आहे. आता माढ्यातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी नसल्याने व पवार यांची एंट्री होत असल्याने महाआघाडीतील नेते पुन्हा सहकार्य करतील अशी अपेक्षा अनेकांना आहे. तशी बोलणी ही सुरू असल्याची चर्चा आहे.
महाआघाडीचे अस्तित्व हे केवळ माढ्यातच आहे असे नाही तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात ही ताकद आहे. मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट भागात ही त्यांना मानणारा मतदार आहे. यामुळे काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांचे या मतदारसंघात ही महाआघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे. सोलापूर मतदारसंघातील मोहोळ व पंढरपूर या मतदारसंघात परिचारक व विजयराज डोंगरे यांची ताकद आहे. यातच माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी ही भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे या पक्षाला सोलापूरची जागा पुन्हा जिंकण्याची आशा आहे. काँगे्रस येथून पुन्हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तिकिट देण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील साडेचार वर्षात परिचारक व शिंदे यांच्यामार्फत महाआघाडीला बळ दिले असल्याने सहाजिकच त्यांची अपेक्षा ही लोकसभा निवडणुकीत या महाआघाडीतील नेत्यांनी सहकार्य करावे अशीच असणार आहे. केंद्रात कोणत्याही परिस्थितीत भाजपाचे सरकार आलेच पाहिजे अशी भूमिका सध्या या पक्षाच्या नेतृत्वाने घेतली आहे. महाराष्ट्रातून भाजपाला मोठी अपेक्षा असल्यानेच त्यांनी शिवसेनेशी पुन्हा युती केली आहे. अशा स्थितीत सोलापूर जिल्ह्यात महाआघाडीने कोणत्याही परिस्थितीत भाजपालाच सहकार्य करावे यासाठी यातील नेत्यांवर दबाव असणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात ही दोन गट असून यात एक सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा तर दुसरा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा आहे. महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे पालकमंत्री गटाचे आहेत. आता माढ्यातून शरद पवार यांच्या विरोधात सहकारमंत्री देशमुख हे भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे सहाजिकच परिचारक व शिंदे यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवार जाहीर होतील व यानंतर माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विशेष लक्ष देवून महाआघाडीच्या नेत्यांना बरोबरच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल हे निश्‍चित आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर ही पडणार आहेत. यामुळे महाआघाडीचे नेते ही ताक फुंकून पित आहेत. त्यांची भूमिका येत्या काळात दिसून येईल. ती भाजपाला अनुकूल ठरते की पवार- शिंदे यांना..हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!