फडणवीस उवाच् : कोरोना निवारण महत्वाचे; राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा चेंडू स्वामी-राणेंच्या कोर्टात

प्रशांत आराध्ये

सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली राज्यपालांची भेट यानंतर भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी राजभवन गाठत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी, या पाठोपाठ पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर झालेली प्रदीर्घ चर्चा व शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विरोधक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणारे ट्विट यामुळे राज्यासह देशपातळीवर मीडियावर महाराष्ट्रात राजकारणावर मंगळवारी सकाळपासून चर्चा घडत होत्या. मात्र दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना सध्या कोरोना संकटावर मात करणे महत्वाचे असल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट लागू ही आमची मागणी नसल्याचे स्पष्ट केले.
वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना केसेच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी येथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते तर सोमवारी 25 मे ला भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट महाविकास आघाडी सरकार कोरोना संसर्ग रोखण्यात अयशस्वी ठरत असल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. यानंतर आता विरोधीपक्ष नेते देेवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळीच भूमिका घेत अगोदर कोरोनाशी लढा महत्वाचे असल्याचे सांगत राष्ट्रपती राजवटीची मागणी ही स्वामी व राणे यांची असल्याचे स्पष्ट केले. मात्र ते दोघे ही भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत हे विशेष.
भाजपाने महाविकास आघाडी सरकार विरोधात नुकतेच महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. या पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरासमोर अथवा कार्यालयांसमोर काळे झेंडे, काळे मास्क लावून राज्य सरकार विरोधात फलकबाजी केली होती. ऐन कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रंगलेले हे राजकारण व भाजपा नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सतत राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेवून त्यांना सादर केलेली निवेदनं, यानंतर सोमवारी घडलेल्या घटना पाहता राज्यात राजकीय भुकंप येणार अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र मंगळवारी दुपारी फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर यावर तुर्तास पडदा पडल्याचे दिसत होते.
सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्य ट्विटनंतर हिंदी व इंग्रजी माध्यमांमध्ये ही यावर चर्चा रंगली होती. सध्याचा काळ हा कोरोना संकटाचा असून महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. अशा वेळी विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र राहून काम करणे अपेक्षित असताना येथे विरोधकांनी आंदोलन सुरू केल्याने जनता ही संभ्रमात पडली होती. सध्या कोरोनाची धास्ती शहरांप्रमाणे ग्रामीणमध्ये ही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे जनतेचे राजकारणापेक्षा सध्या उपाय योजनांवर लक्ष जास्त आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!