बचतगटाचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वाखाली पंढरीत निघालेल्या महिला मोर्चाला भव्य प्रतिसाद
पंढरपूर- कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने बचत गटातील महिलांचे मायक्रो फायनान्स आणि बँकांकडील सर्व कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर मनसेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारो महिलांनी सहभाग नोंदविला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडेदहाच्या दरम्यान या मोर्चास सुरूवात झाली. प्रारंभी मनसेचे सरचिटणीस यांनी मोर्चात सहभागी सर्वांना कोरोनाविषयक नियम पाळण्याची विनंती केली. हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला तेथे प्रशासनास निवेदन देण्यात आले. शहर ,तालुका व आजुबाजूच्या परिसरातून बचत गटाच्या हजारो महिलांनी यात सहभाग घेतला.
बचतगटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून व्यवसायसाठी या महिलांनी कर्ज घेतली आहेत. गेली पंधरा वीस वर्षे याची नियमित कर्जफेड होत होती. मात्र सध्या कोरोनामुळे मागील सहा महिन्यापासून व्यवसाय ठप्प झाले आहेत. घरगुती उद्योग बंद पडल्याने कर्जफेड करणे शक्य नाही. भागभांडवल बुडाले आहे. या मायक्रो फायनान्स कंपन्या प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दर वर्षी विमा पॉलिसीच्या नावाखाली हजारो रुपये घेतात, परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाहीत. सध्या कोरोनामुळे व्यवसाय उद्योग ठप्प झाल्याने या विम्याचे पैसे मिळणे आवश्यक होते. मात्र सर्टिफिकेट नसल्याने या प्रक्रियेला ही खीळ बसली आहे. याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे दिलीप धोत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मायक्रो फायनान्सचे या महिलांना कर्जफेडीसाठी तगादा लावत असून तो तातडीने थांबवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सिद्धेश्वर गरड, निकिता पवार, रंजना इंगोले, पूजा लावंगकर, महेश पवार ,सागर घोडके,प्रताप भोसले, प्रथमेश पवार , प्रशांत इंगळे,जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, अमोल झाडगे, अप्पा करचे, सतीश दीडवाघ,अनिल केदार, बालाजी वाघ, दिलीप पाचंगे, दीपाली थोरात,नागेश इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाच्या वेळी पंढरपूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.