बार्डी वनक्षेत्रातील मुक्या प्राण्यांची तहान-भूक भागविण्यासाठी धावले पंढरीचे विठ्ठल मंदिर
पंढरपूर – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी मंदिरे समितीच्या वतीने या काळात गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तालुक्यातील बार्डी वनक्षेत्रात गाई, हरीण, काळवीट असून त्यांच्यासाठी मंदिराने चारा व पाण्याची सोय केली आहे.
कोरोना व्हायरसचा पादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने दिनांक 17 मार्च, 2020 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून पंढरपूर शहर व परिसरात अडकून राहिलेल्या मजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्या वतीने दररोज 3000 फूड पॅकेट देण्यात येत आहेत.
यातच मध्यतरीच्या काळात अशी बाब निदर्शनास आली की, शहरात अंदाजे 60 जनावरे अशी आहेत की, ती दान दिलेल्या चाऱ्यावर त्यांची उपजीविका होती. परंतु लॉकडाउनमुळे त्यांना कोणीच चारा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे या मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंदिर समितीने 5500 ते 6000 रुपयांचा चारा गेल्या 10 दिवसापासून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
अशा परिस्थितीत बार्डी तालुका पंढरपूर येथील वन क्षेत्रामध्ये 300 पेक्षा जास्त गाई व 200 पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीव आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना विविध स्वयंसेवी संस्थेकडून चारा पुरवठ्याचे काम केले जात होते. परंतु कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून गाईचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब मंदिर समितीचे मा सदस्य श्री संभाजी शिंदे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीकडे या जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी अशी आग्रहाची मागणी केली होती.
त्यानंतर सदस्य श्री. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी व व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांनी सदर ठिकाणी सक्षम भेट दिली व वस्तुस्थिती ची पाहणी केली.त्यामध्ये अंदाजे 300 हुन अधिक गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती.
त्यानंतर सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य महोदयांशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिला टप्पा म्हणून काल दि 4, मे 2020 रोजी 2500 पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळील श्री सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज 150 ते 200 पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. तसेच दर दोन दिवसांनी 25,000 लीटर पाणी टँकर द्वारे पाठवून तेथील पाण्याची टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल.
सद्यस्थितीत 300 च्या आसपास जनावरे या ठिकाणी असल्याचा अंदाज आहे. परंतु ही संख्या वाढली तर त्यांच्यासाठी अधिकचा चारा व पाणी मंदिर समितीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.