बाहेरून नागरिकांना घेवून सोलापूर जिल्ह्यात 43 हजार वाहने आली, 28 ठिकाणी चेकपोस्ट

पंढरपूर,दि.18- लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात 43 हजार वाहनांनी लोक दाखल झाले अहोत. या पैकी आठ हजार वाहने जिल्ह्यातील असून उर्वरित 35 हजार वाहनं येथे बाहेरून आली होती. अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.
या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातून रोज दोन ते अडीच हजार लोक आपल्या गावी परत जात असून पाचशे ते सहाशे लोक येथे दाखल होत आहेत. त्यांच्या तपासणीसाठी 28 मार्गावर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी परत असल्याने स्थानिक नागरिकांनी आणखी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुखांनी केले आहे. ते पंढरपूरला आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पंढरीतील आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरली जावू नये अशीच पोलीस प्रशासनाची भूमिका असून याबाबत काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत याबाबतचे मत मांडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली. चौथ्या लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली असून आता पोलिसांची भूमिका देखील बदलली असल्याचे पाटील यांनी सांगितले. आता नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडता येणार असले तरी त्यांनी शासनाचे सर्व नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले. कारण कोरोना हा काही दिवसात संपणारा आजार नाही. यामुळे प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवावे, वारंवार हात पाय धुणे, मास्क घालणे आदी नियम पाळावेत असे ते म्हणाले.
पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी पंढरपूरप्रमाणे जिल्ह्यात इतरत्र देखील त्यांना आयुर्वेदिक काढा देण्यात येत असून च्यवनप्राशचे देखील वाटप करण्यात येणार आहे. तसेच 20 हजार हायड्रोक्सिक्लोरोक्विन गोळ्यांचा साठा येथे तयार आहे. जिल्ह्यातील 13 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 11 जण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित दोघांची तब्येत देखील ठणठणीत असल्याचे मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!