भगवंतालाही गुणामध्ये आल्याशिवाय भक्तीरस प्राप्त होत नाही – कृष्णा महाराज चवरे
श्री क्षेत्र आळंदी दि . २६ – संत देहात आल्यावर आपल्या स्वमहीमे मध्ये असतात . त्यांना भक्तीरस प्राप्त करणेसाठी सत्वगुणाचा आधार घ्यावा लागतो. कल्पित भेद स्वीकारून भक्ती भजन यातुन रस प्राप्त करावा लागतो. तसाच देवाला ही गुणाशिवाय भक्तीरस प्राप्त होत नाही असे प्रतिपादन कृष्णा महाराज चवरे यांनी केले .
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण आयोजित करण्यात आले आहे . आज ( शुक्रवार ) चौदाव्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कृष्णा महाराज चवरे यांनी गुणातीतयोग या चौदाव्या अध्यायावर निरुपण केले .
चवरे महाराज म्हणाले , ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून विचार आहे. समाज मनाला दिशा देणारा अनमोल ठेवा आहे. प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन गरजेचे असलेने त्यासाठी ग्रंथ तयार केले आहेत. सर्व ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अलौकिक व भक्ती ज्ञानाने ओतप्रोत आहे.
श्रीमद्भगवतगीतेवरील भाष्य आहे. देववाणी ला संतवाणी मध्ये रूपांतर केले आहे. या ग्रंथातील प्रत्येक अध्याय स्वतंत्र विषय प्रतिपादन करणारा आहे. १४ व्या अध्याया मध्ये तीन गुणांचे विस्तृत वर्णन आढळते. तीन गुण हे संसार, व्यवहारा मध्ये महत्वाचे आहेत. तसे परमार्थ, साधना, सेवा या मध्येही महत्वाचे आहेत. परंतु तीन गुणामधील रजोगुण, तमोगुण हे बाधक आहे म्हणूनच रजोगुणाच्या बाधकत्वाचा विचार मांडताना श्रीज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत चिंतन मांडतात की ,
हे रज याची कारणे । जीवाते रंजवू जाणे ।
हे अभिलाखाचे तरूणे । सदाची गा ।।
त्याचबरोबर तमोगुणाच्या बाधकत्वाचा विचार मांडताना श्रीज्ञानोबाराय चिंतन मांडतात
एवं निद्रालस्यप्रमादी । तम इया त्रिबंधी ।
बांधे निरुपाधी । चोखटाते ।।
म्हणजेच रजोगुण,तमोगुण हे बाधक असून सत्वगुण हा साधकासाठी खूपच महत्वाचा आहे. दोन गुण साधनेला प्रतिबंध करणारे आहेत. त्यामुळे त्याचे ज्ञान गरजेचे आहे. त्याचा विस्तार या अध्याया मध्ये केला आहे.रजोगुण हा विकाराला जन्म देतो व ते विकार दुःखाला जन्म देतात. दुःख निवृत्तीसाठी रजोगुण व तमोगुण निवृत्ती गरजेची आहे. यासाठी सत्वगुण वृद्धी झाली पाहिजे म्हणून वारी, सत्संग आयोजन केले जाते. आषाढी पालखी सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षापासून सांभाळली आहे. सत्वगुण वृद्धीसाठी वारी ही महत्वाची आहे म्हणून ती पिढ्यान पिढ्या संभाळली आहे.
देवाला सुद्धा अवतार घेताना गुणात्म प्रकृती स्वीकारावी लागते. निर्गुण असलेला देव सगुण होतो. या कार्यक्रमाचे निवेदन स्वामीराज भिसे यांनी केले .उद्या शनिवार दि . २७ रोजी श्री क्षेत्र अटाळी ता खामगाव जि बुलढाणा येथील प्रमोद महाराज राहणे हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर पुरुषोत्तमयोग या पंधराव्या अध्यायावर निरुपण करतील .
दरम्यान आज ( शुक्रवार ) पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री श्री बंडोपंत वाईकर यांच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री गो-हेकर व निकम यांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .