‘भविष्यातील भारत’ विषयावर सा. विवेकच्या वतीने 27 सप्टेंबरपासून राष्ट्रजागरण व्याख्यानमाला
मुंबई – सा. विवेकतर्फे ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ या ग्रंथाचे प्रकाशन येत्या विजयादशमीला होत आहे. यानिमित्ताने आठ दिवसांची ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. याचा शुभारंभ 27 सप्टेंबर रोजी रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘परमवैभवशाली राष्ट्रउभारणीचा मार्ग कसा असावा’, याविषयी ते आपले मनोगत व्यक्त करतील.
तर ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर 4 ऑक्टोबर रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे समारोपाचे सत्र होणार आहे. या व्याख्यानमालेत गोविंददेवगिरी महाराज – धर्मविचार : काल आज आणि उद्या, अविनाश धर्माधिकारी – जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान, निवेदिता भिडे – रचनात्मक कार्यातील महिलाशक्ती, उद्यमशील भारतासाठी याविषयावर मिलिंद कांबळे आणि प्रकाश राणे, योगेश सोमण – कलामाध्यमातून प्रकट होणारा भविष्यातील भारत, तर युवकांचा भारत या विशेष सत्रात इंद्रनील पोळ – माहिती तंत्रज्ञान, सिद्धराम पाटील – प्रसारमाध्यमे आणि अशोक देशमाने – सेवा कार्य आणि भविष्यातील भारत या विषयांवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
या संपूर्ण व्याख्यानमालेचा मध्यवर्ती विषय भविष्यातील भारत असा असून या विषयाचे विविध पैलू उलघडले जाणार आहेत. या ऑनलाइन व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी https://www.facebook.com/VivekSaptahik/live/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहोनेरकर यांनी केले आहे.