भाजपाचे दोन मंत्री असताना ही माढ्याची जबाबदारी चंद्रकांतदादांवर
पंढरपूर- सोलापूर जिल्ह्याचे दोन मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असले तरी लोकसभा निवडणुकीत माढ्याची जबाबदारी भाजपाने मुळचे कोल्हापूरचे असणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविली आहे. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद असली तरी ती गटतटात विखुरलेली आहे. येथील राजकारणात सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे गट आहेत. लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे हे ज्या भाजपप्रणित महाआघाडीचे नेते होते ती आघाडी पालकमंत्री देशमुख यांच्या गटाशी निगडीत आहे. या महाआघाडीच्या नेत्यांचे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पटत नसल्याचे चित्र यापूर्वी दिसून आले आहे. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपात मोहिते पाटील यांच्यासह अनेक गट सहभागी झाले आहेत. अशावेळी गटबाजी ऐवजी सर्वांचा समन्वय रहावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना माढ्यात पाठविले असावे अशी चर्चा सुरू आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गेली काही वर्षे चांगले काम उभे केले असून पक्षाचा विस्तार केला आहे. मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी ही त्यांनीच महत्वाची भूमिका बजावली आहे. असे असले तरी भाजपा प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्वाचा मानत असून येथे विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात दोन्ही काँगे्रसचे वर्चस्व असले तरी सध्या भाजपामध्ये होत असलेले अन्य पक्षातील नेत्यांचे इनकमिंग पाहता निकाल काय लागेल हे सांगता येणे कठीण बनले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याच पुढाकाराने फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपावासी झाल्याचे बोलले जाते. निंबाळकर हे सातारा काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष होते.
चंद्रकांत पाटील यांनी शनिवारपासून माढा मतदारसंघात साखरपेरणी केली असून त्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी आपण भाजपाचाच प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. सांगोल्यात त्यांनी भाजपा व मित्रपक्षांच्या सर्व नेत्यांना एकत्र करत मेळावा घेतला. पाटील यांनी अकलूजमध्ये मोहिते पाटील समर्थकांशी चर्चा करून तेथे खासदार विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल याची ग्वाही दिली आहे. शिवसेनेची या मतदारसंघातील ताकद पाहता त्यांनी शिवसेना नेते आमदार डॉ. तानाजी सावंत व प्रा.शिवाजी सावंत यांची भेट घेतली. याच बरोबर करमाळ्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जगताप गटाचे शंभूराजे जगताप भाजपात प्रवेश करते झाले आहेत. सोमवारी जिल्हा काँगे्रस उपाध्यक्ष कल्याणराव काळे हे पंढरीत भाजपाप्रवेशाबाबत निर्णय जाहीर करणार आहेत.