भीमा-नीरा खोऱ्यातील धरणे क्षमतेने भरली, यंदा सोलापूर जिल्ह्यालाही पर्जन्यराजाची साथ

पंढरपूर – भीमा व नीरा खोऱ्यातील पिंपळगाव जोग व माणिकडोह वगळता बहुतांशी सर्व प्रकल्प क्षमतेने भरले आहेत. टेलएन्डच्या उजनी धरणात ही 109 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. अद्याप पाऊस संपलेला नाही. दरम्यान सर्वच धरण भरल्याने गतवर्षीप्रमाणेच यंदाही लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान यंदा सोलापूर जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान जून महिन्यापासून नोंदले गेले आहे. जिल्ह्यात 12 सप्टेंबरपर्यंत सरासरी 436 मि.मी. पावसाची नोंद आहे.
जून महिन्यापासून पावसाने भीमा व नीरा खोऱ्याला साथ दिली आहे. मध्यंतरी जुलै महिन्यात याची नोंद कमी झाली असली तरी टेलएन्डच्या उजनीसारख्या प्रकल्पांवर तो बरसत राहिल्याने याचा फायदा प्रकल्पांना झाला आहे. उजनी धरणावर 603 मिलीमीटर पावसाची यंदा नोंद आहे. नीरा खोऱ्यातील धरणे भरल्याने यातून पाण्याचे विसर्ग मागील महिन्यापासून होत आहेत. वीरच्या पाण्याने नीरा व भीमा नदी सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहत आहेत. अद्यापही पाणी सोडले जात आहे.
यंदा उजनीच्या व नीराच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण योग्य असल्याने शेतीला याचा फायदा झाला आहे. अनेकदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी पडतो व यामुळे पावसाळ्यातच नीरा व उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी होत असते. मात्र 2020 ला पर्जन्यराजाने सोलापूर जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखविली आहे. जिल्ह्यात जून महिन्यापासून 436 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. मागील वर्षी 2019 याच तारखेपर्यंत 225 मि.मी. पाऊस सरासरी जिल्ह्यात नोंदला गेला होता. दरम्यान चांगल्या पावसामुळे उजनी व वीरमधून पाण्याची मागणी झाली नाही. धरणे भरल्यानंतर यातून पाणी सोडले जात आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सरासरी 387 मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या 127 टक्के आहे तर सप्टेंबर महिन्यात 12 तारखेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 49.2 मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे.
दरम्यान भीमा व नीरा खोऱ्यातील धरणे भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. नीरा खोऱ्यातील पाण्यावर सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असते. माळशिरस, पंढरपूर, सांगोला भागात उजवा कालव्याचे पाणी सिंचनाला मिळत असते. तेथील गुंजवणी, देवघर, भाटघर, वीर हे साच प्रकल्प क्षमतेने भरले आहेत.
भीमा व नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती व कंसात यंदाचे पर्जन्यमान ः पिंपळगाव जोगे 42.55 टक्के (624), माणिकडोह 44.11 (582), येडगाव 96.77 (864), वडज 96.63 (386), डिंभे 98.89 (812), घोड 95.33 ( 379), विसापूर 96.53 ( 275), कलमोडी 100 (901), चासकमान 100 (699), भामा आसखेडा 95.58 (825), वडीवळे 93.55 (2094), आंध्रा 100(976) , पवना 100 (1635), कासारसार्इ 100 (929), मुळशी 100 (2714), टेमघर 96.75 (2726), वरसगाव 100 (2055), पानशेत 100 (2154), खडकवासला 100 (887). नीरा ः गुंजवणी 99.58 (2061), देवघर 100 ( 1885), भाटघर 100 (904) वीर 100 (530), नाझरे 100 (483), उजनी 109.45 मि.मी. ( 603 मि.मी.).

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!