मंगळवारी दशमीला ५ जिल्ह्यातून ९ मानाच्या पालख्या पंढरीत येणार
पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली असली तरी परंपरा अबाधित राहण्यासाठी शासनाने नऊ संतांच्या पालख्यांना पंढरीत येण्यास परवानगी दिली असून या संत पादुका पंढरीत आणण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पाच जिल्ह्यातून या पालख्या मंगळवारी दशमी दिवशी रात्रौ नऊ वाजेपर्यंत पंढरीत दाखल होतील.यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू, संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण, संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर, विठ्ठल-रूख्माई संस्थान, कौंडण्यपूर, चांगावटेश्वर देवस्थान, सासवड. या पालख्यांचा समावेश आहे.दोन जुलैला सकाळपासून मानाच्या पालख्यांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस भेटीचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पालख्यांचे पंढरपूर येथून संबंधित संस्थानकडे प्रस्थान होणार आहे.आषाढी वारीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नऊ पालख्यांना अटी-शर्थीवर परवानगी दिली आहे. या पालख्यांसमवेत मानाचे 20 वारकरी असतील. त्यांची कोविड-19 चाचणी झालेली असावी, वृद्ध वारकर्यांना वारीत सामील होता येणार नाही.1 जुलैला पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत यावेळी मंदिर समितीने ठरविलेले मानाचे वारकरी उपस्थित असतील.नागरिकांनी दर्शन व चंद्रभागेत स्नानासाठी विनाकारण गर्दी करू नये. केवळ मुख्यमंत्र्यांसोबत असणार्या महत्वाच्या व्यक्ती आणि मानाच्या पालखी प्रमुखांना प्रवेशपत्रिकेसह पादुकांसह मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. केवळ कर्तव्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांना परवानगी असणार, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले. वारीमध्ये महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 1500 पोलीस आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी असणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. वारकरी व भाविकांनी पालख्या व विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येऊ नये. घरातूनच लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मंदिर समितीने आपल्या संकेतस्थळावर आणि जिओ टीव्ही, टाटा स्काय डिशवर श्रीचे लाइव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे. तसेच ‘श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान’ या मोबाईल अॅप्लिकेशनवरही उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरमधून अॅप ‘श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान’ या नावाने उपलब्ध आहे. तसेच महापूजेच्या लाइव्हसाठी खाजगी चॅनेलने दूरदर्शनच्या डीटीएचमधून डीडी सह्याद्री ही लिंक डाऊनलोड करावी.