मंगळवेढा- पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक असल्याने बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम या सरकारने येथे स्थगित ठेवली आहे. 17 एप्रिलच्या मतदानानंतर पाहा पुन्हा वीज जोडण्या तोडल्या जातील, असे झाले नाही तर माझे नाव बदला. या महावसुली सरकारने मागील दोन वर्षात शेतकर्यांकडून वीज बिलापोटी पाच हजार कोटी रूपये वसूल केले आहेत. तर कोरोनात नुकसान झाले म्हणून बड्या बिल्डरना पाच हजार कोटी रूपयांच्या सवलती दिल्या आहेत, असा घणाणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदारद्वय सिध्देश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, हे लोकशाहीचे सरकार नसून ते लॉकशाहीचे सरकार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महाविकास आघाडीचे सरकार असफल झाले आहे. या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्यासारख्या तरूण व विकासात्मक नेतृत्वाला संधी द्या व महावसुली सरकारला मोठा शॉक 2 मे ला द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील सिंचन योजनांना केंद्रातील मोदी सरकारनेच पेैसे दिले असून अनेक प्रकल्प प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भाषणा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. मतदारांनी आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो याचा विचार करून मतदान करावे. कारण या मतदारसंघात आवताडे विजयी झाले की ते या भागातीाल दुसरा आमदार ते असणार आहेत. प्रशांत परिचारक हे सध्या विधानपरिषदेत काम करतच आहेत. त्यांना आवताडेंची साथ मिळेल व विकासाची गाडी या डबल इंजिनामार्फत आपण ओढू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
रयत क्रांतीचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कालच्या पावसातील सभेची खिल्ली उडविताना स्पष्ट केले की, जयंत पाटील यांनी पावसात भिजून काही फायदा नाही , त्यांनी अगोदर मंगळवेढ्यातील पस्तीस गावातील शेती भिजवून शेतकर्यांना न्याय द्यावा.
उमेदवार समाधान आवताडे यांनी सांगितले की, संत दामाजी कारखान्याच्या एकाही सभासदाचे सभासदत्व रद्द होणार नाही, असे मी जाहीर आश्वासन देतो. विरोधक विनाकारण अशी अफवा उडवित असून यात काही तथ्य नसल्याने आवताडे म्हणाले. दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काहात मरणार नाही अशी शपथ या भागातील शेतकर्यांनी घ्यावी व मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. याच मुद्दयावर बोलताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखान्यांच्या अक्रियाशील सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा कायदा शरद पवार हे केंद्रात मंत्री असताना आला होता असे सांगितले.