मरिआई समाजाच्या व्यथा मांडणारा ”डमरू” लघुपट
– लेखक-दिग्दर्शक रशीद निंबाळकर यांची वार्तालापात माहिती-
दिल्लीच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांक-
जिल्ह्यातील मोहोळ तालुका येथील पेनुर,कोनेरी गावात चित्रीकरण
सोलापूर – मरीआई समाजाच्या व्यथा, वेदना मांडणारा वास्तववादी डमरू हा लघुपट आहे. मी पण याच समाजातला असल्यामुळे कुठे तरी आपल्या समाजाची परिस्थिती, व्यथा जनतेसमोर यावी म्हणून शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून व्यथा मांडली असल्याचे डमरू या फिल्मचे लेखक-दिग्दर्शक रशीद निंबाळकर यांनी सांगितले.
दिल्ली येथे झालेल्या एनएचआरसी गव्ह. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्या क्रमांकाने ‘डमरू’ या लघुपटाला गौरविण्यात आला. त्यासंदर्भात आज श्रमिक पत्रकार संघात या लघुपटाच्या टीमचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेखक-दिग्दर्शक रशीद निंबाळकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, कलाकार उषा निंबाळकर ,साहेबराव जाधव, भारत निंबाळकर,दामोदर पवार हे कलाकार उपस्थित होते.निंबाळकर म्हणाले, मरीआई समाजामध्ये शिक्षण शिक्षण फार कमी आहे. गावात चार ते पाच व्यक्ती सोडल्यास समाजातील व्यक्ती निरक्षर आहेत. लोक एका गावाहून दुसऱ्या गावाला भटकत जातात. स्त्रिया कुठेही मुलांना जन्म देतात. त्यामुळे त्यांची जन्माची नोंद होत नाही. डमरू या लघुपटात मध्ये डमरू या नावाच्या मुलाला शाळा शिकण्याची इच्छा आहे पण तो जन्मदाखला आणि एका जागी स्थिर नसल्याने मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत, म्हणून डमरु शाळा शिकू शकत नाही. आणि पुन्हा त्याला पारंपरिक व्यवसायाकडे वळावे लागते अशी कथा डमरुची कथा आहे.डमरू या लघुपटाचे चित्रीकरण पेनूर, कोन्हेरी या गावात झाले आहे. 12 मिनिटं 56 सेकंदाची ही शॉर्टफिल्म असून यासाठी निकॉन 5 डी हा कॅमेरा वापरला आहे. शॉर्टफिल्म पूर्ण करण्यासाठी 2 महिन्याचा अवधी लागला. या लघुपटात कोणतेही जुने कलाकार नसून मरिआई समाजातील बांधवांनी अभिनय केला आहे. त्यासाठी त्यांना 15 दिवसाची ट्रेनिंग ही दिली होती. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म प्रदर्शनात उत्कृष्ट लेखन दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले.प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते दिग्दर्शक निंबाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. या वार्तालापाचे सूत्रसंचालन पत्रकार जाकीरहुसेन पिरजादे यांनी केले.
जाती व्यवस्था बाहेर काढणे गरजेचे
डमरू चित्रपटात सत्य परिस्थिती मांडली आहे. सध्याच्या काळातही जातिव्यवस्थेला माणूस चिकटून बसला आहे.जातीव्यवस्था बाहेर काढणे गरजेचे आहे. समाजातील कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत.
आगामी चाबूक चित्रपटातून जात पंचायत, जातीय व्यवस्थावर भाष्य करणार
लवकरच जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा चाबूक चित्रपट निर्मिती करीत आहे. याचे लेखन पूर्ण झाले आहे. जात पंचायतमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत, मुलीला वाद्य वाजवता न आल्यास लग्न होऊ देत नाही अशा विविध प्रकारची अंधश्रद्धा आजही जात पंचायतमध्ये आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या व्यवस्थेवर आवाज उठवणार आहे.
रशीद निंबाळकर, लेखक-दिग्दर्शक