महापुरात नुकसान झालेल्या भीमा , माण, सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंतची कर्जमाफी द्या : आ. परिचारक यांची विधानपरिषदेत मागणी       

पंढरपूर – महापुरामुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा, माण आणि सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंतची कर्जमाफी द्यावी आणि २ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी ,अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली.

आ.परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात २०१९ व २०२० या सलग दोन वर्षांत अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला . त्यांनी सांगितले की , २०१९ व २०२० या सलग दोन वर्षांत भीमा आणि माण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले. या दोन नदीकाठी सुमारे ५ लाख शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. २०१९ मध्ये महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी सरकारने मान्य केली नाही. या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या आधारे नुकसानभरपाई मिळत नाही. फळबागांबाबत २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राचे नुकसान झाले असेल तरच पीक विमा भरपाई मिळते. या दोन्ही नदीकाठच्या ऊस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले . मात्र त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून अत्यल्प मदत मिळाली. नुकसानीची व्याप्ती पाहता या शेतकऱ्यांना १ लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी व २ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या ऊस उत्पादकांना भरपाई देणे आवश्यक आहे.
पीक विम्याची भरपाई मिळण्याबाबत असलेले विचित्र निकष बदलण्याची गरज असल्याचेही आ.परिचारक यांनी निदर्शनास आणून दिले. सलग 5 दिवस 25 मि.मी. पाऊस झाल्यास भरपाई मिळते, मात्र एकाच दिवशी 150 मिमी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, या सारखे निकष बदलावेत अशी सूचना आ.परिचारक यांनी केली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही भरपाई मिळाले नसल्याचे आ.परिचारक यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. महापुरात ओढे, नदीकाठच्या विहिरी गाळाने बुजल्या, जमिनी खरवडून गेल्या , घरे वाहून गेली अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर करूनही भरपाई मिळालेली नाही . या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आ .परिचारक यांनी केली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!