महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीत नक्की काय दडलय?
प्रशांत आराध्ये
पंढरपूर– विधानसभेची मतमोजणी होवून दिहा दिवस होत आले असून ज्यांना जनतेने बहुमत दिले त्या भाजपा व शिवसेना युतीत अद्याप सरकार स्थापनेवरून एकमत झालेले नाही. दुसरीकडे विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी युतीतील नाराज शिवसेनेला बरोबर घेवून सत्ता स्थापन करण्याच्या वल्गना ही होवू लागल्या आहेत. यातच नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अचानक काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा रंगली होती. राज्यात अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त आहे, हजारो कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे, उद्योगक्षेत्र मंदीने ग्रासले आहे, बरोजगारीचा प्रश्न वाढत असताना निवडणुकीत बहुमत मिळून ही महायुती सरकार स्थापन करू शकत नसल्याने राज्याच्या राजकीय कुंडलीत नक्की काय लिहिले आहे? याची चिंता नागरिकांच्या मनात आहे.हिदुंत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना व भाजपामध्ये जो तणाव सध्या दिसत आहे तो इतका वाढला आहे की मतमोजणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकत्र ही दिसले नाहीत. यामुळे सत्तेसाठी चर्चा तरी कशी होणार हा प्रश्न आहे. भाजपाच्या दिल्लीश्वर नेत्यांचा मुंबई दौरा झालेला नाही. गृहमंत्री अमित शहा व ठाकरे यांची भेट होणार अशी चर्चा होती पण ती ही नंतर हवेच विरली. भाजपाने 164 जागा (मित्रपक्षांसह) लढून 105 जागा पदरात पाडून घेतल्या आहेत तर शिवसेनेने 124 जागा लढवून 56 ठिकाणी विजय मिळविला आहे. दोन्ही काँग्रेस पक्षांनी शंभरच्या आसपास जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने एकट्याने शंभरहून अधिक जागा जिंकण हे ही त्यांची ताकद वाढल्याचे दाखवून देत आहे. येथील राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आयचे प्राबल्य होते मात्र 2014 पासून आता भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ही मोठी सल अन्य पक्षांच्या मनात नक्कीच दिसत आहे. लोकसभेला देखील मोदी करिष्मा दिसला व महायुतीला सर्वाधिक जागा जिंकता आल्या.आता विधानसभा निवडणुकीत युती करून शिवसेना व भाजपा लढले आणि निकालानंतर मात्र त्यांच्यात तणाव वाढला आहे. यामुळे राज्यात सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हे वारंवार महायुतीचे सरकार सत्तेत येणार असे सांगत असले तरी शिवसेना यास प्रतिसाद देण्यास तयार नाही. ठाकरे व फडणवीस यांच्यात संवाद नाही. दिल्लीतील नेते वेट अॅण्ड वॉच भूमिकेत आहेत. भाजपामधील शांतता ही वरून दिसत असली तरी आतून अनेक घडामोडी घडत असणार हे निश्चित. अनेक राज्यांमध्ये भाजपाने यापूर्वी अशा स्थितीत आपली सरकार आणून दाखविली आहेत. हरियाणात ही जागा कमी असताना ज्यांच्या विरूध्द भाजपा लढला त्या दुष्यंत चौताला यांच्या जेजेपी पक्षाला बरोबर घेत दोन दिवसात सरकार स्थापन करण्यात आले आहे.महाराष्ट्रात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असून अपक्षांसह त्यांचे बळ 120 आमदारांचे होत असल्याने मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास हा पक्ष तयार होणार नाही. शिवसेनेने ताणले असले तरी भाजपा ही शांतच आहे. यापूर्वी या पक्षातील काही नेते बोलत होते मात्र आता त्यांना ही शांत राहण्यास कदाचित सांगितले गेले आहे. यातच शिवसेना व दोन्ही काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेस पक्षात ही शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले आहेत. काँग्रेस हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे व शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर आक्रमक असते. अशा वेळी दोन भिन्न विचारसरणी एकत्र येणे शक्य नाही. यावर अद्याप ही निर्णय नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे दोन्ही काँग्रेसला राज्यात चांगल्या जागा जिंकत्या आल्या आहेत. पवार यांचा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला आहे. त्यांनी ही निवडणूूक निकालानंतर आम्ही विरोधकात बसण्यास तयार आहोत असे विधान केले आहे. मात्र आता नवी दिल्लीत त्यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होत असून या चर्चेत काय निर्णय होणार यावर बरेच काही अवलंबून आहे.भाजपाच्या गोटातील शांतता, सत्ता स्थापनेच्या युतीकडून होत नसलेल्या हालचाली, दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांचा शिवसेनेला बरोबर घेवून सरकार बनविण्याचा दिला जात असलेला सल्ला, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतली जात असलेली वेट अॅण्ड वॉचची भूमिका, शिवसेनेकडून भाजपावर सतत होत असलेली टीका, यानंतर ही भाजपाकडून पाळले जात असलेले मौन..याचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न जनतेला पडला आहे. यामुळे राज्याच्या कुंडलीत नक्की काय लिहिले आहे. हे समजत नाही.