पंढरपूर- राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाची महाविकास आघाडी सत्तेत आहे. दोन्ही काँग्रेसला सोबत घेवून काम करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पक्षशिस्तला प्राधान्य दिल्याचे दिसत असून पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत बंडखोरी करणार्या महिला पदाधिकार्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. स्थानिक पातळीवर येथील पदाधिकारी हे राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात उतरले आहेत.
राज्यात सत्ता स्थापन करताना अनेक अडचणींचा सामना महाविकास आघाडीला करावा लागला आहे. यानंतर विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढले आणि त्यांना चांगले यश मिळाले आहे. त्यावेळी तीनही पक्षातील समन्वय दिसून आला होता. आता पंढरपूरची पोटनिवडणूक होत असून ही जागा आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झाली आहे. यामुळे सहाजिकच यावर राष्ट्रवादीचा दावा आहे व येथून भगीरथ भारत भालके यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. ही उमदेवारी जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक शैला गोडसे यांनी अर्ज दाखल केला होता. हे शिवसेनेच्या नेतृत्वाला रूचले नाही व त्यांनी गोडसे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार्या शिवसेनेचा कणखरपणा पुन्हा दिसून आला आहे.
आता स्थानिक पातळीवर शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात गुंतले आहेत. कालच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे मेळावा घेतला यावेळी जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे व सर्व शिवसेना प्रणित आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. भालके यांचा अर्ज दाखल करताना ही शिंदे सोबत होते. दरम्यान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी भक्कम ठेवण्याचे जे आदेश दिले आहेत त्यानुसार येथील पदाधिकारी आघाडीधर्म पाळून कामाला लागले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून याचेे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे करत आहेत. त्यांचा आदेश पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी अंतिम असतो. पंढरपूरची पोटनिवडणूक ही भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची केली असून आपली ताकद पूर्णपणे पणाला लावली आहे. आता शिवसेनेनेही येथे आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. पंढरपूर व मंगळवेढा भागात शिवसेनेची ताकद मोठी आहे.