महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील रोष पंढरपूर मतदारसंघात मतांच्या रूपाने बाहेर पडणार : चंद्रकांत पाटील

पंढरपूर– राज्यात कोरोना हाताळण्यात आलेले अपयश, राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण तसेच वाझे प्रकरणामुळे झालेली बदनामी यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या सरकार विषयी प्रचंड राग असून तो व्यक्त करण्यासाठी जनता वाट पहात आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मतांच्या रूपाने हा रोष बाहेर पडणार असून भाजपाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने समाधान आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. या नंतर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, राम शिंदे व प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, संभाजी निलंगेकर आदी आमदार, नगराध्यक्षा साधना भोसले, उपसभापती राजश्री भोसले, आरपीआयचे राजाभाऊ सरवदे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, डॉ.बी.पी.रोंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील यांनी, हे सरकार स्थापन झाल्या पासून सर्वसामान्यांना फसवत असल्याचा आरोप केला. अतिवृष्टी मदत, कोरोना काळातील अपयश, वीज तोडणी व आता वाझे प्रकरण या सर्वांचा परिणाम म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेच्या या सरकारच्या विरोधात कौल दिला. साडे सहा हजार ठिकाणी भाजपाचे सरपंच नियुक्त झाले. यामुळे जाणता राजा घाबरला आणि त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तातडीने पुढील निवडणुका न घेण्याची सूचना केली. यामुळे ५ महानगरपालिका, ९२ नगरपरिषदा तसेच शेकडो सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्याचा दावा पाटील यांनी केला.
पंढरपूर येथे होणार्‍या पोटनिवडणुकीत परिचारक व आवताडे हे दोन गट एकत्र आल्याने आमचा विजय निश्‍चित आहेच. तसेच सरकार वरील नाराजीमुळे मतांची आघाडी आणखी वाढणार असल्याचा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी यांनी, राज्याच्या सत्ता परिवर्तनाचे बिगुल पंढरीतून वाजले असल्याचे सूचक वक्तव्य केले. पंढरीतून परिवर्तन होणार असून ते राज्यामध्ये देखील लवकरच होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.
राम व लक्ष्मणाची जोडी
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक या बंधुचा उल्लेख राम लक्ष्मणाची जोडी असा केला. आजच्या जगात एखाद्या व्यक्तीकडे दोन रूमाल असतील तर तो एक रूमाल देणार नाही. परंतु या परिचारक बंधुंनी मनाचा मोठेपणा दाखवत समाधान आवताडे यांच्यासाठी माघार घेतली. दोघां पैकी एकानेच निवडणुकीच्या रिंगणात उभे रहावे असा विचार पक्षाने मांडल्या नंतर यावर प्रशांत परिचारक यांची दावेदारी होती. मात्र त्यांनी मोठे मन करून आवताडे यांना संधी दिली. यामुळे भाजपा परिचारक यांचा आभारी आहे या शब्दात कौतुक केले.
गुलाल घेवूनच मुंबईत जाणार
महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून त्यांच्यामुळे संपूर्ण देशात राज्याची बदनामी झाली आहे. लवकरच हे सरकार खाली उतरणार असून भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा आवताडे यांनी केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मागील तीनवेळा जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने प्रश्‍न सोडविले नाहीत. मतदानामधून ही नाराजी बाहेर पडणार असून परिचारक यांच्या मदतीने दोन तारखेला गुलाल घेवूनच मुंबईत जाणार असल्याचा विश्‍वास समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.
एकेकाचा हिशोबा चुकता होणार
राज्यात वाझे प्रकरणामुळे मोठी कलाटणी मिळाली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुजरातध्ये जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. यामुळे हे प्रकरण आता गुंडाळले जाणार का असा प्रश्‍न चंद्रकांत पाटील यांना करताच, केवळ भेट घेतली म्हणून आमचे नेते नरेंद्र मोदी व अमित शहा अन्यायावर पांघरूण घालणार नाहीत असा दावा करून उलट एकेकाचा हिशोब चुकता करणार असा गंभीर इशारा दिला. या प्रकरणामध्ये आता इडी व सीबीआय देखील तपास करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!