महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ४:- ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे.
राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलीस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!