महाशिवआघाडीच ठरलंय..आता भाजपासाठी दोन्ही काँग्रेसचा हात सोडणार्यांची अडचण..
प्रशांत आराध्ये
राज्यात भाजपाची लाट होती हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. त्यावेळी काँग्रेस आय व राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गजांनी बाहेर पडत हाती कमळ घेतले होते. लोकसभेला भाजपाला मोठे यश मिळाले व यानंतर विधानसभेला तर महाजनादेशाची अपेक्षा होती. शिवसेना व भाजपाला जनादेश मिळाला खरा पण युती मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून तुटली आणि शिवसेनेने दोन्ही काँग्रेसला बरोबर घेत महाशिवआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याने ज्यांनी राज्यात भाजपाप्रणित सत्ता येणारच असा विश्वास ठेवून स्वपक्ष सोडला होता त्यांची भलतीच अडचण झाली आहे. सत्तेच्या दोर्या पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हाती गेल्याने येत्या काळात बरीच पक्षत्याग केलेली मंडळी स्वगृही परत येतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधून अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता. विधानसभेनंतर भाजपाचे राज्य येणार अशी त्यांना खात्री होती. मात्र आता महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा व शिवसेनेला यश मिळाल्याचे पाहता अनेक अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला मात्र त्यांचा ही अंदाज आता चुकला आहे.राज्यातील अनेक दिग्गजांनी दोन्ही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील,त्यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे पाटील, सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील, सातार्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तर राष्ट्रवादीच्या खासदारकीचा अवघ्या काही महिन्यात राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला होता. त्यांचा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला. तेथील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही भाजपात विधानसभेपूर्वी प्रवेश केला आहे. याच बरोबर सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी देखील काँग्रेस सोडून हाती कमळ घेतले होते. यांच्यासह अनेक माजी धनंजय महाडिक असोत की इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असोत अथवा अन्य नेते यांनी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असा विश्वास बाळगून भाजपात येणे पसंत केले होते मात्र आता विधानसभेनंतर सारी परिस्थितीच बदलली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून अनेकांनी भाजपा व शिवसेनेला जवळ केले होते. मात्र त्याच पवार यांनी जिद्दीने राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्याची जवळपास तयारी पूर्ण केली आहे. येथे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आय यांची महाशिवआघाडी निर्माण झाली असून ते शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करणार हे आता निश्चित झाले आहे. यामुळे भाजपात आलेल्यांची कोंडी झाली आहे तर शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा फायदा होताना दिसत आहे. दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट असली तरी महाशिवआघाडीच्या अंतिम चर्चेनंतर त्यांचे संख्याबळ पाहता ते सहज बहुमत सिध्द करू शकत असल्याने येत्या आठ ते दहा दिवसात राज्यात नवे सरकार स्थापन होईल असे दिसत आहे.