पंढरपूर – श्री विठ्ठलाला हरीहराचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. कारण येथे भगवंताने आपल्या मस्तकावर श्री महादेवाची पिंड धारण केली आहे. चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेला जाणाऱ्या कावडी अगोदर पंढरीत आणल्या जातात. अशा या विश्वदेव श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या मंदिरात गुरुवारी महाशिवरात्री दिवशी बारा ज्योतिर्लिंगांची आरास करण्यात आली आहे.
श्री शिवशंभू यांना प्रिय पांढऱ्या शेवंतीची १ टन फुले व हिरवी बेलपत्र वापरुन मंदिर सजविण्यात आले आहे. ही आरास भक्त अनंत नंदकुमार कटप यांनी दिली असून आरास साई डेकोरेटर्स व शिंदे बंधू यांच्यासह मंदिर समिती कर्मचाऱ्यांनी केली आहे.प्रत्येक दिन विशेषला भक्तांकडून येथे आरास केली जाते.