महाशिवरात्री उत्सवासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई, दि. 10 : कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी दिनांक 11/03/21 रोजी महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने
गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
*मार्गदर्शक सूचना*
1. महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवांपैकी एक मोठा उत्सव मानला जातो. देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील भिमाशंकर, परळी-वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ व घृष्णेश्वर या देवस्थानी तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व मंदिर विश्वस्त/व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
2. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात मोठया प्रमाणात पूजाअर्चा केली जाते व दर्शनासाठी अनेक भाविक त्याठिकाणी गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविड- 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजाअर्चा करावी, यासाठी प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती करणे आवश्यक आहे.
3. कोविड- 19 चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सोशल डिस्टन्सींगचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त 50 भाविक दर्शन घेतील, यादृष्टीने संबंधित विश्वस्त अथवा व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर, इ.) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
4. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे मंदीराचे व्यवस्थापक व स्थानिक प्रशासन यांनी विशेष
लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत,
5. प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वत:हून मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेष्ठ नागरीक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये.
6. महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.
7. कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२१०३०९१६२८२८९६२९ असा आहे. साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
असे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले आहे.