महिला आयोग काय केवळ भाजपाशी निगडीत महिलांसाठीच आहे काय?: राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या श्रेया भोसले यांचा प्रश्न
पंढरपूर , दि. 1- उत्तर प्रदेशमधील हाथरस व बदलापूर या दोन ठिकाणी तरूणींवर अत्याचार करून त्यांना मारण्याच्या घटना घडल्या आहेत. हाथरस येथील पीडित मुलीचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबाच्या ताब्यात न देता त्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले आहेत ही मोठी अमानवीय घटना आहे. याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत. आमचा पंतप्रधान मोदी यांना प्रश्न आहे की, केंद्रीय महिला आयोग कोठे आहे.. का हा आयोग केवळ भाजपाशी निगडीत असणाऱ्या महिलांसाठीच आरक्षित ठेवला आहे काय? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले यांनी विचारला
उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथे घडलेले दलित मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणानिषेध पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला व युवती आघाडीच्या वतीने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घटनेतील पीडित मुलीला श्रध्दांजली वाहण्यात आली. या घटनेतील दोषींवर कडक कारवार्इ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हाथरस प्रकरणाचे निषेध सर्वत्र होत असून पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवतीच्या आघाडीच्या वतीने यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनिता पवार यांच्यासह साधना राऊत, संगीता माने, चारूशिला कुलकर्णी, कीर्ती मो, डॉ.अमृता मेणकुदळे, योगीता मस्के, गायत्री सावंत, सुधीर भोसले, सचिन कदम, शुभम साळुंखे उपस्थित होते.