महिला व आवश्यक सेवेसाठी 112 क्रमांकाची  नवी यंत्रणा संपूर्ण राज्यात राबविणार : गृहमंत्री अनिल देशमुख

वर्धा दि, 21 :- आरोग्य विभागाच्या 108 टोल फ्री क्रमांक ज्याप्रमाणे काम करतो तशीच 112 क्रमांकाची सुविधा पोलीस विभागामार्फत महिला व आवश्यक सेवेसाठी संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वर्धा येथे दिली. वर्धा येथे पोलिस अधिक्षक कार्यालयात वर्धा जिल्हयाच्या कायदा व सुव्यवस्थे संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या 112 क्रमांकाच्या यंत्रणेमध्ये महिलांची छेडखानी, अपघात तसेच इतर आवश्यक अश्या सर्व सेवा या क्रमांकावर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी 2500 चारचाकी गाडी, 2 हजार दुचाकी गाड्या घेण्यात येणार असून त्यांना जीपीएस ने जोडण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हात यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने 12 हजार 500 पोलिस पदे भरतीचा निर्णय घेतलेला होता, त्यासंदर्भात 5 हजार 300 पोलिस भरतीची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविडच्या काळात कोविडच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने जनतेसाठी काही नियम केले होते. राज्यात बहुतांश जनतेने नियमांचे पालन केले. मात्र काही लोकांनी नियमांचे उल्लंघन केले. यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसलेली प्रकरणे राज्य सरकार मागे घेईल,असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सागितले.

यावेळी सोबत नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!