माझी वसुंधरा अभियानामध्ये लोकसहभाग वाढवा : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना
सोलापूर, दि.21: माझी वसुंधरा अभियान पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धतीसाठी राबविण्यात येत आहे. प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतस्तरावर अभियानामध्ये लोकसहभाग वाढवून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
श्री. राव यांनी आज हरित लवाद, स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
श्री. राव यांनी स्वच्छ सर्वेक्षणचा आढावा घेतला. ते म्हणाले, माझी वसुंधरा अभियानासाठी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमधील निधी वापरावा. यामध्ये जिल्हा नियोजन समिती, सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून कामे करावीत. नाविन्यपूर्ण योजनांमधील निधीचाही वापर करावा. सामाजिक संस्था, उद्योजक यांचे प्रायोजकत्व घेऊनही माझी वसुंधरा अभियान राबवा. याबाबत येत्या आठवडाभरात रूपांतरण योजना तयार करा.
जास्तीत जास्त वृक्षारोपन होण्यासाठी प्रयत्नशील रहा. प्रत्येक नगरपालिकेने कचरा गोळा करून हरित लवादाप्रमाणे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेची उपलब्धता करून घ्यावी. कचरा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे या कामांना प्राधान्य द्या. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल त्वरित तयार करून अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी श्री. राव यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. घर बांधणीसाठी लाभार्थी काम करण्यास तयार नसेल तर त्यांना 15 दिवसाची नोटीस द्या. कोणताही निधी अखर्चित ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानाबाबतचा आराखडा त्वरित तयार करावा. माझी वसुंधरा मोहिमेबद्दल जनजागृतीसाठी प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर ई-प्रतिज्ञा (ई-प्लेज) यासाठी वेगळी प्रक्रिया राबवा. वर्दळीच्या ठिकाणी ई-प्रतिज्ञेविषयी सेल्फी पॉईंट तयार करावा. प्रत्येकाला ई-प्रतिज्ञा घेतल्यानंतर ऑनलाईन सर्टीफिकेट मिळण्याची व्यवस्था करा. मोबाईलद्वारेही या अभियानामध्ये सहभाग घेता येतो. मिळालेले सर्टीफिकेट सोशल मीडियावर अपलोड करून इतरांना प्रेरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.