माढ्यातून पवारच उमेदवार असतील ? गडकरींचा ही अंदाज
माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नको म्हणणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा येथूनच लोकग्राहस्तव निवडणूक रिंगणात उतरतील, असा अंदाज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तविला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघारी घेतलेल्या उमेदवारीबाबत गडकरी यांना विचारले असता ते म्हणाले, देशात भाजपाला चांगले वातावरण असल्याने कदाचित पवार यांनी अंदाज घेवून उमेदवारी मागे घेतली असावी परंतु शरद पवार हे अनुभवी राजकारणी असून ते कधी काय करतील याचा अंदाज बांधणे अवघड आहे. कदाचित तेच माढ्याचे उमदेवार असतील असे वाटते. पक्षातील कार्यकर्त्यांनी व जनतेने आग्रह करावा व यानंतर पुन्हा रिंगणात यावे असे त्यांना वाटत असावे असे गडकरी यांनी या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
देशाच्या राजकारणात नितीन गडकरी हे ताकदवान नेतृत्व असून त्यांच्या कामामुळे ते देशभर प्रसिध्द आहेत. त्यांचे शरद पवार यांचे संबंध ही नेहमीच चांगले राहिले आहेत. गेले काही दिवस माढ्याचे राजकारण पाहता येथून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स या वेळेपर्यंत तरी कायम आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत माढ्याचे नाव नाही. आता दोन दिवसात उतरलेल्या सर्व मतदारसंघातील उमेदवार जाहीर होतील असे शरद पवार, प्रफुल्ल पटेल व तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय पवार यांनी अगोदर घेतला होता व तशी घोषणा ही झाली. यानंतर मागील आठवड्यात त्यांनी हा निर्णय मागे घेतल.
माढा लोकसभा मतदारसंघ हा पवार यांच्यासाठी सोपा असून येथे हा विधानसभा क्षेत्रात तीन ठिकाणी राष्ट्रवादी, एका जागेवर मित्रपक्ष शेकाप, एक ठिकाणी काँगे्रस व अन्य एका जागेवर शिवसेनेचा आमदार आहे. या मतदारसंघात पवार यांना मानणारा मतदार व कार्यकर्ते आहेत. याच जोरावर पवार यांनी 2009 ला निवडणूक लढविली व मोठ्या फरकाने जिंकले होते. 2014 ला ते थांबले पण 2019 ला पुन्हा त्यांनी लोकसभेतून निवडून जावे असा आग्रह झाल्याने त्यांनी माढ्याला प्राधान्य दिले. त्यांना येथून कोणाचाच विरोध नाही. राष्ट्रवादीतील गटबाजी ही त्यांच्या आगमनाने कमी होते हा अनुभव आहे. अशी स्थिती असताना ही त्यांनी मावळमधून पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्यावर एकाच घरात जास्त लोकसभेचे उमेदवार नकोत या कारणास्तव स्वतः थांबण्याचा निर्णय घेतला.
यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली व आता येथून कोणाला पवार संधी देणार ? याकडे सार्यांचे लक्ष आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील, दीपक साळुंखे, प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा सध्या सुरूच आहे. या काळात बर्याच घडामोडी घडत आहेत. माढ्याच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स इतका वाढला आहे की येथून नवीन चेहरा पुढे केला जाण्याची शक्यता वर्तविली जात होती तर काहींनी येथील अन्य पक्षात गेलेल्या एका मातब्बर नेत्याला पुन्हा राष्ट्रवादीत आणून उमेदवारी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीसाठी प्रत्येक जागा महत्वाची असून माढा ही विनिंग सीट असल्याने ती कायम राहण्यासाठी येथे भाजपाला आव्हानं देवू शकणार्या उमेदवाराची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला रोखण्यासाठी पवार हे प्रयत्नशील आहेत. यामुळेच कदाचित ऐनवेळी पुन्हा माढ्यातून शरद पवार यांचे नाव राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यासाठी भाजपाने माढ्यातून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले असल्याचे समजते व त्यांचे दौरे ही येथे सुरूच आहेत. जोवर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होत नाही तोवर भाजपा ही नाव जाहीर करणार नाही. सध्या भाजपा व राष्ट्रवादी एकमेकांना आजमावत आहेत. यामुळेच नागपूरमध्ये वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी पवार हे माढ्यातून कदाचित राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील अशी जी शक्यता वर्तविली आहे ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. गडकरी हे देश व राज्यातील राजकारणाला चांगलेच ओळखतात व राजकारण्यांना देखील.
17 मार्च पर्यंत माढा ,मावळ व उर्वरित ठिकाणचे उमेदवार राष्ट्रवादी जाहीर करू शकते. आता तरी सार्यांचे लक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. कारण आपल्या नातवाच्या मावळच्या उमेदवारी साठी शरद पवारांनी माढ्याच्या जागेचा त्याग केला आहे. या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नाहीत हे विशेष.