माढ्यात अनेक नेते भाजपाच्या मागे..मात्र मतदार कोणाच्या पाठीशी ?

माढा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपा जिंकणारच असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथे राष्ट्रवादीविरोधी लाट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपात होत असलेले अन्य पक्षीय नेत्यांचे इनकमिंग तसेच जिल्ह्यातील भाजपप्रणित महाआघाडीच्या उर्वरित प्रवर्तकांवर त्यांचा मोठा भरोसा दिसत आहे. माढ्याची लढत त्यांनी प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान माढ्यातील मतदार हा नेत्यांच्या पाठीमागे जाणार का ? हा मोठा प्रश्‍न आहे.
दुष्काळ, कृषी विषयक प्रश्‍न, पाणीटंचाई यासह अनेक दैनंदिन समस्यांनी ग्रासलेला मतदार या निवडणुकीत त्याच्या प्रश्‍नावर कोण बोलणार ? याकडे कान लावून बसला आहे. मात्र सध्या तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत त्याचे प्रश्‍न बाजूला असून येथे पक्षांतरावरच जादा चर्चा होत असल्याचे चित्र आहे. माढा मतदारसंघ हा स्थापनेपासूनच गाजत आहे. यंदा ही शरद पवार येथून उभारणार म्हणून सुरू झालेल्या चर्चा व नंतर त्यांनी बदलेला निर्णय व यापाठोपाठ घडलेल्या अनेक राजकीय घटना यामुळे मतदार ही संभ्रमात होता. भाजपाचा उमेदवार उशिरा जाहीर होणे, राष्ट्रवादीने भाजपाच्या जवळ असणार्‍या संजय शिंदे यांना पक्षात घेवून उमेदवारी देणे यामुळे ही निवडणूक गाजत आहे. सध्या दोन्ही प्रमुख पक्षांचे जे उमेदवार आहेत ते अन्य दलातून आलेले आहेत. शिंदे हे भाजपाचे सहयोगी होते ते आता राष्ट्रवादीचे उमदेवार आहेत तर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँगे्रसमध्ये होते ते आता भाजपाचे उमेदवार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघ हा अनेक विषयांनी गाजत आहे. देशात सर्वाधिक चर्चेत याचा समावेश होतो. अगोदर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.मात्र नंतर निर्णय बदलला व पवार घराण्यातील किती जणांनी लोकसभा लढवायची ? हा प्रश्‍न उपस्थित करत माढ्यातून उमेदवार बदलण्याचे संकेत दिले. मुळात या मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे काम चांगले होते व येेथे त्यांनी विरोधात असताना ही भाजपाच्या सत्ताकाळात अनेक विकास कामे केली होती. राष्ट्रवादीने येथे कधी शरद पवार तर कधी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची चर्चेत आणून मोहिते पाटील गटाचे खच्चीकरण केले. याचा परिणाम असा झाला की मोहिते पाटील गटाने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात केले.
याच बरोबर मोहिते पाटील विरोधकांचे नेते जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी साडेचार वर्षाची भाजपाची मैत्री तोडली. ते अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेला विजयी झाले होते तर करमाळा विधानसभेला त्यांनी भाजपाप्रणित महायुतीची साथ घेतली होती. जिल्हा परिषदेत सत्ता मिळविताना त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी साथ केली व यासाठी समविचारी नेत्यांनी महाआघाडी स्थापन केली. संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाही तिकिट देण्यास तयार होते पण शिंदे यांनी विधानसभेचे कारण पुढे करत ती ऑफर नाकारली होती. मात्र त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला जवळ करत त्यांची उमेदवारी घेतल्याने सहाजिकच देवेेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.
शिंदे यांना शह देण्यासाठी माढा मतदारसंघात समाविष्ठ असणार्‍या सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने पक्षात घेतले. निंबाळकर हे सातारा जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष होते. त्यांनी पक्षत्याग करत भाजपात प्रवेश केला व माढा मतदारसंघाची उमेदवारी घेतली. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असून तेथील आणखी काही नेते भाजपात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे यंदा भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर व त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या मतदारसंघातील अनेक नेत्यांना पक्षात आणण्याचा सीलसीला सुरू करण्यात आला. करमाळ्याचे जगताप गटाचे शंभूराजे जगताप यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला तर पंढरपूरचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांचा गट दोनच दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कमळाला जवळ करत आहे. जगताप व काळे यांच्या भूमिकेमुळे भाजपाला करमाळा व पंढरपूर तालुक्यात फायदा होईल. मोहिते पाटील गट भाजपात आल्याने त्यांचे जे समर्थक जिल्ह्यात व माढा मतदारसंघात आहेत ते आपोआपच भापजाकडे वळत आहेत.
दरम्यान संजय शिंदे यांनी साडेचार वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करून ऐनवेळी त्यांची साथ सोडून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारल्याने चिडलेल्या भाजपा वरिष्ठांनी येथे दोन्ही काँगे्रसमधील व शिंदे विरोधकांना भाजपाकडे वळविण्यास सुरूवात केली आहे. या ठिकाणी जर शरद पवार उमेदवार असते ते कदाचित या नेत्यांनी पक्ष सोडताना अनेकदा विचार केला असता.
या मतदारसंघातील जनता सध्या उमेदवारांचे, प्रमुख नेत्यांचे पक्षबदल पाहत आहे. ही निवडणूक लोकसभेची असून ती अनेक प्रश्‍नांवर लढविली जात आहे. यामुळे मतदार जागृत होवून आपले मत देतो हे 2014 दिसून आले आहे. या मतदारसंघात पाणीटंचाई, दुष्काळ, बरोजगारी , कृषी विषयक , उद्योगांची कमतरता असे अनेक प्रश्‍न आहेत. यावर ही या निवडणुकीत मंथन होणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून नेते जे पक्षप्रवेश करत आहेत ते त्यांच्या हिताचा निर्णय आहे यातून मतदारांना काय मिळणार ? हा मोठा प्रश्‍न आहे. सत्ताधार्‍यांबरोबर राहिल्यास अडचणीत आलेल्या संस्थांना मदत मिळू शकते तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत याचा उपयोग होवू शकतो. हा विचार करून अनेकांनी लोकसभेच्या तोंडावर पक्ष बदलले आहेत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. यामुळेच मतदार विचारत आहेत की, मोठ्या प्रमाणात नेते जरी सत्ताधार्‍यांना जवळ करत असले तरी जनतेच्या मनात काय आहे ? आणि त्यांचे मुलभूत प्रश्‍न या पक्षप्रवेशाच्या जल्लोषात विरून तर जाणार नाहीत ना ? .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!