मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांचे प्रश्न तत्काळ सोडवावेत – धैर्यशील मोहिते पाटील यांची आग्रही मागणी

संतोष भोसले

अकलूज– कोरोनाचा फटका राज्यातील वृत्तपत्र व्यवसायाला बसला असून तो मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. पत्रकारांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण देत राज्यातील विविध वृत्तपत्र समुहातील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे तर अद्याप ही प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू आहे. या प्रश्नात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालावे व पत्रकारांच्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करावी अशी मागणी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सामाजिक संस्था, नागरिक सर्वच राजकीय संघटना आपल्या परीने गरजूंना मदत करीत आहेत. या संकटाचा अनेक उद्योगधंदे, व्यापारावर व अनेक लोकांच्या नोकरीवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक उद्योगधंदे कंपन्यांनी मनुष्यबळ कमी करण्यास सुरूवात केली आहे.

वृत्तपत्रात वार्ताहर, उपसंपादक, छायाचित्रकार, मुद्रितशोधक, डीटीपी ऑपरेटर अशी कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचानक नोकरी गेलेल्या या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात नवीन नोकरी मिळणे अवघड आहे. पत्रकारांनी कोरोनाकाळात कुठे नोकरी मिळवायची असा मोठा प्रश्न आहे. अनेक लोकांनी एकाच वर्तमानपत्र समुहात दहा -पंधरा वर्षे कार्यकाळ घालवला आहे. मात्र आता त्यांना काम सोडावे लागत आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सामना सारख्या मोठ्या माध्यम समुहाशी निगडीत आहेत. यामुळे ते पत्रकारांच्या व्यथा जाणतात. आता कोरोनाकाळात या क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती व पत्रकार, कर्मचारी यांच्या समस्या त्यांनी जाणून घेवून तत्काळ या वर्गाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!