मोदींच्या काळात बेबंदशाही ; विरोधकांनी देशहितासाठी एकत्र यावे :सुशीलकुमार शिंदे

पंढरपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात बेबंदशाही निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान वारंवार सांगत होतो. तेच आता सुरू आहे असा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी करत विस्कटलेल्या विरोधकांनी आता देशपातळीवर देशहितासाठी आपल्यातील भेदभाव विसरून एकत्र आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक, कै.वा.ना. महाराज उत्पात व कै.रामदास महाराज जाधव, राजूबापू पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे पंढरीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे, पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अ‍ॅड.राजेश भादुले, सुहास भाळवणकर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची परिस्थिती मृतावस्थेकडे जात असल्याची जळजळीत टीका यावेळी शिंदे यांनी केली. ते म्हणाले, लोकशाही उलटविण्याचे काम सुरू आहे. हाथरससारख्या एक नाही तर अनेक घटना घडल्या आहेत. हे चांगले चित्र नाही. मात्र काँग्रेसचे सरकार असताना जे लोक आमच्या कारभारावर आरोप करीत होते, ते आता गप्प आहेत. गरीबांचे जगणे मुश्कील झाले आहे, सामाजिक, आर्थिक, वैचारिक परिस्थिती रसातळाला गेली आहे.

आरक्षणावरून समाजामध्ये फूट पाडण्याचा अनेक मोठे लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला असून हे कुठे थांबणार? असा सवाल करत त्यांनी संविधानातील सर्वधर्मसमभाव कुठे गेला? असा सवाल शिंदे यांनी केला. सध्या मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षण मागणीसाठी आंदोलने सुरू असून ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यास देखील विरोध होत आहे. हे वातावरण पाहिल्यावर काय वाटते या प्रश्‍नावर शिंदे यांनी, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून यामध्ये अनेक मोठे लोक आहेत असा दावा केला. सध्या वैचारिक पातळी रसातळाला गेली असून हे कुठे थांबणार माहित नाही या शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणी 80 हजार फेक अकांउट सोशल मीडियावर तयार केल्याचे तपासात निष्पन्न झालेअसून यावर शिंदे म्हणाले, सामाजिक माध्यमाचा चुकीचा वापर होतो व याचा फटका मला ही बसला आहे. सोशल मीडियावर मी एका समाजवर टीका केल्याची खोटी माहिती पसरवून मला माफी मागण्यास भाग पाडले यांची आठवण त्यांनी सांगितली. दरम्यान राज्यातील सत्तेचे परिवर्तन होणार हे भाजपाचे स्वप्न असून ते स्वप्नच राहणार असल्याचा टोला शेवटी सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!