यंदा सहकार महर्षी कारखाना सर्वाधिक ऊसदर देणार तर लवंगीच्या भैरवनाथ कारखान्याकडून गतहंगामासाठी 511₹ प्रतिटन वाढीव बिलाची घोषणा

सहकार महर्षी यंदा उच्चांकी दर देणार, कामगारांना बोनस जाहीर

अकलूज – चालू हंगामामध्ये 14 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने ठेवले असून सभासदांना जिल्ह्यात क्रमांक एकचा दर देणार असल्याची घोषणा अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
सभासदांना चांगला दर देण्याची घोषणा करताना त्यांनी कामगारांना समाधानकारक बोनस देण्याचे जाहीर केल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार महर्षी कारखान्याच्या 59 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सहकार महर्षी कारखान्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न करून सुमारे 33 कोटी रूपयांची मदत शासनाकडून मिळवून दिली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच हा गळीत हंगाम सुरळीत चालणार असल्यामुळे आम्ही त्यांचे आम्ळी आभारी आहोत, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते व जयसिंह मोहिते-पाटील यांचे अध्यक्षतेखाली मोळी पूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच डिस्टिलरी व अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड उत्पादन शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक नामदेव ठवरे व त्यांच्या पत्नी शांताबाई ठवरे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सर्व संचालक कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सर्व खातेप्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.

कर्मयोगी कारखाना 14 लाख टन ऊस गाळप करणार

इंदापूर– कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 चा 31 वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाणीचे पूजन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या गळीत हंगामामध्ये कारखान्याने 14 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उदिष्ट ठेवले असून यासाठी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. तसेच या हंगामामध्ये डिस्टिलरीचे उत्पादन 1 कोटी 30 लाख बल्क लीटर, सहवीज निर्मिती 3 कोटी युनिटस, बायोगॅस 12 लाख घनमीटर, सेंद्रिय खत 4 लाख बॅग, कंपोस्ट खत 24 हजार मे.टन व जैविक खते/औषधे 20 हजार लीटर एवढे उत्पादन पूर्ण केले जाणार आहे.
मागील वर्षीच्या गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाची उर्वरित एफआरपी ची रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक , कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.

भैरवनाथ शुगर्सचे सहा लाख टन ऊस गाळणार, गतहंगामातील उसाला वाढीव 511 ₹ दर

मंगळवेढा – तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा 7 वा गळीत हंगाम चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. कारखान्याने या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे.
यावेळी उपाध्यक्ष अनिल सावंत उपस्थित होते. प्रारंभी शिवाजीराव सावंत व सरव्यवस्थापक रवींद्र साळुंखे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. तसेच ऊस वाहतूक वाहनांचे पूजन अनिल सावंत व पीयूष पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण पूजा तानाजी चव्हाण व त्यांच्या पत्नी सविता चव्हाण यांचे हस्ते करण्यात आली.
प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले क, कारखान्याचे संस्थापक आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील 6 गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तसेच यावर्षी ऊसाची क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणण्यात येईल, याची शेतकर्‍यांनी काळजी करू नये. गेल्या वर्षीच्या गळीत हंगाम 2019-20 मधील ऊस बिल एफआरपी प्रमाणे पूर्ण दिलेले आहे. गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पाहता गत हंगामात गळीतास आलेल्या उसास 2511 प्रमाणे ऊस दिला जाईल. यापूर्वी दोन हजार रुपये प्रतिटन दर दिला असून उर्वरित 511 रुपये प्रतिटन फरक लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
यावेळी अविनाश वाडेकर, किरण सावंत, शैला गोडसे, सुधीर अभंगराव, महावीर देशमुख , रवी मुळे, तानाजी मोरे, तुकाराम भजने, राजू पाटील, आप्पा जाधव, रमेश चोपडे, रामकृष्ण चव्हाण, कृष्णा निकम, मनोहर चव्हाण,शाम गोगाव,बंडू जाधव उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!