यात्रा अनुदानातून पंढरीत प्रदक्षिणा मार्गावर पावणे चार कोटीचे काँक्रिटीकरण व कराड रस्त्यावर पथदिव्यांसाठी 70 लाखांची तरतूद
पंढरपूर– यात्रा अनुदानामधून प्रदक्षिणा मार्गवर 3 कोटी 79 लाखाचे काँक्रिटीकरण व तालुका पोलीस स्टेशन ते ठाकरे चौक येथील नवीन झालेल्या काँक्रिट रस्त्यावर पथदिवे बसविण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली
महाराष्ट्र शासनाने नगरपरिषदेस यात्रा अनुदानापोटी पाच कोटी रुपये मंजूर केले होते.यातून शहरातील विविध कामे करणे अपेक्षित असते. त्यानुसार शासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन अधिकारी, नगराध्यक्ष साधना नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची समिती गठित केली असून याची बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाली. यात शहरामध्ये येणारा प्रत्येक भाविक हा प्रदक्षिणा मार्गावरुन जात असतो याचा विचार करुन प्रदक्षिणा मार्गावरील कालिका देवी चौक ते चौफाळा ते नाथ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता काँक्रिटीकरणे करण्यासाठी 3 कोटी 79 लाख रूपये तसेच तालुका पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय ते ठाकरे चौक ते राम मंदिर व पुढे दत्तनगर या ठिकाणी झालेल्या काँक्रिट नवीन रस्त्यावर पथदिवे बसविण्यासाठी 70 लाख रूपयांच्या कामास मंजुरी दिली आहे.
तसेच कोरोनाविषाणूमुळे प्रतीकात्मक पद्धतीने भरण्यात आलेल्या आषाढी, कार्तिकी, माघी यात्रा कालावधीमध्ये साफसफाई करणे, जंतूनाशक फवारणी, वाखरी पालखी तळावर ईओसी सेंटर उभा करणे व इतर कामासाठी 52 लाख रुपये मंजूर करण्यात आले. वरील सर्व कामे करण्याबाबत आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सूचना दिल्या होत्या.