युती तुटली..दोष कुणाचा? शिवसेनेच्या डोक्यावर खापर फोडण्यात अर्थ काय…

प्रशांत आराध्ये

भाजपाने गेल्या काही दिवसात दोन्ही काँग्रेसधील अनेक दिग्गजांना फोडून वाढविलेली ताकद, यामुळे सहाजिकच काँग्रेस व राष्ट्रवादीत भाजपाबद्दल चीड निर्माण झालेली आहे. यातच महायुतीतील घटक पक्षांना ही आपल्याच चिन्हावर उभे करण्याचा केलेला प्रयत्न, अडचणीचे कारण पुढे करत शिवसेनेला दिलेल्या कमी जागा..यावरून भाजपाची विस्तारण्याची भूक मोठी असल्याचे दिसत आहे. सहाजिकच सत्तेत पुन्हा भाजपाला आली तर ती अन्य विरोधी पक्षांबरोबर शिवसेनेसाठी ही धोकादायक ठरली असती. जेंव्हा गरज आहे तेंव्हा मित्रपक्षांना गोंजारायचे आणि नंतर त्यांचीच ताकद कमी करायची..हे धोरण शिवसेनेने ओळखले आहे. बिहारमध्ये नितीनकुमार ज्या प्रमाणे आपली ताकद अबाधित ठेवण्यासाठी बार्गेनिंग पॉवर वाढवितात तसेच शिवसेनेने मुख्यमंत्रिपद व समान पद वाटपाच्या मागणीवरून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर  महाराष्ट्रात केले. यातून युती तुटली असली तरी शिवसेनेचा कणखरपणा पुढे आला हे निश्‍चित. यामुळे युती तुटल्याचा दोष शिवसेनेला देण्यात अर्थ नाही.

महाराष्ट्रात 1990 च्या काळात भाजपाला पाय रोवण्यासाठी शिवसेनेने सहकार्य केले. हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादामुळे भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते प्रभावित होते. स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, स्व.प्रमोद महाजन यांनी शिवसेनेशी मैत्री वाढविली. त्याच काळात अयोध्येत  राममंदिराचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. यानंतर 1995 ला राज्यात शिवसेना व भाजपाची सत्ता आली. अर्थात मोठा भाऊ शिवसेना होती व मुख्यमंत्रिपदाची दावेदार ही. या काळात भाजपाच्या अनेक नेत्यांना येथे मंत्रिपद मिळाली व त्यांनी कामाची चुणूक दाखविली. स्व.गोपीनाथराव मुंडे, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सारखी नेतृत्व पुढे आली. राज्याच्या व देशाच्या राजकारणात भाजपाला महाराष्ट्रातील या सत्तेचा उपयोग झाला. यानंतर 1999 ते 2014 युती सत्तेपासून दूर राहिली. काँग्रेस आघाडीने येथे सत्ता उपभोगली. मध्यंतरीच्या काळात भाजपाने आपला विस्तार झपाट्याने केला व आमदारांच्या संख्याबळात शिवसेनेला ही ओव्हरटेक केले. 2014 ला सर्व पक्ष स्वतंत्र लढले, यात भाजपा 122 जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिला. यानंतर पुन्हा नाईलाजाने युती झाली व भाजपा व शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. देशात ही भाजपाचे सरकार असल्याने महाराष्ट्रात ही याचा उपयोग होवू लागला. मात्र 2014 च्या निवडणुकीपासून भाजपा व शिवसेनेत निर्माण झालेली कटूता कमी झाली नाही. वाद होत होते. अशात ही देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी सरकार चालविले. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार यावे म्हणून भाजपाने मित्रपक्षांचे हट्ट पुरविण्याचा निर्णय घेतला. यातूनच बिहारमध्ये नितीश कुमार व महाराष्ट्रात शिवसेनेला चांगल्या जागा देण्यात आल्या. केंद्रात भाजपा सर्वाधिक जागा घेवून विजयी झाला. यानंतर  भाजपा पुन्हा मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला आणि येथील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 124 जागांवर समाधान मानायला भाग पाडले व स्वतः 164 जागा घेतल्या. मित्रपक्ष ही कमळाच्या चिन्हावरच उभे केले. लोकसभेला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता असा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे म्हणणे आहे. मात्र भाजपाने यास दुजोरा दिला नाही व अखेर निवडणूक पूर्व झालेली व सत्ता मिळविलेल्या युतीला तुटावे लागले आहे. आता शिवसेना ही काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे सांगता येणे कठीण आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!