युपीएससी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ग्रामीणचा झेंडा
पंढरपूर – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमधील ९ जणांनी घवघवीत यश मिळविले आहे. पंढरपूर, माढा व बार्शी तालुक्यातून प्रत्येकी दोनजण उत्तीर्ण झाले आहेत तर अक्कलकोट, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी एक जणांचा यात समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण हे 109 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रामीण भागाचा या परीक्षेतील वरचष्मा कायम राहिला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी व कासेगाव या शेजारच्या गावांमधून दोनजण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. खर्डी येथील राहुल चव्हाण याने 109 वा क्रमांक मिळविला आहे ते आयएएस झाले असून आयपीएससाठी कासेगाव येथील अभयसिंह देशमुख हे उत्तीर्ण झाले आहेत. त्याने 151 वा क्रमांक मिळविला आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच त्यांनी पूर्ण केले आहे.
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या प्रसिध्द आयएएस अधिकार्यांच्या गावाजवळील बोकडदरावाडी येथील अश्विनी तानाजी वाकडे हिने 200 वा क्रमांक मिळवित यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. घरातील इतर सदस्य प्रशासकीय सेवेतच असलेल्या अश्विनीने जिद्दीने हे यश मिळविले आहे. माढा येथील निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांनी 744 व्या क्रमांकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. त्यांचे शिक्षण सोलापूर व पुणे येथे झाले आहे.
माळशिरस तालुक्यातील वाघोली सागर भारत मिसाळ हा 204 वा क्रमांक पटकावित केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. लहान गावात जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षण घेवून त्याने मिळविलेले यश मोठे आहे. बी.एस.सी.अॅग्री असणार्या सागर याच्या आजच्या निकालाची बातमी गावात समजताच तेथे आनंद व्यक्त करण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील बावची या गावाचा श्रीकांत कुंडलिक खांडेकर याने यूपीएससी परीक्षेत 231 वा क्रमांक मिळविला आहे. त्याच्या वडिलांनी परिस्थितीशी झगडत जिद्दीने मुलांची शिक्षण केली आहेत. श्रीकांत यांनी कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
अक्कलकोट येथील शेतकरी शिवकुमार कापसे यांचा मुलगा योगेश हा यूपीएससी परीक्षेत 249 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अक्कलकोटलाच झाले, नंतर त्याने लातूर व पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
बार्शी तालुक्यातील चुंब या डोंगरघाटातील गावामधील अविनाश जाधवर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा 433 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली असून ते आयएएस झाले आहेत. त्याचे शिक्षण माध्यमिकपर्यंतचे शिक्षण चुंबमध्येच झाले होते तर नंतर बार्शी व पुण्यात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. बार्शी तालुक्याने आजवर चार आयएएस अधिकारी दिले असून आता अविनाश यांच्या रूपाने पाचवा अधिकारी मिळाला आहे. बार्शी येथील अजिंक्य विद्यासागर हे 489 व्या क्रमांकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. त्यांना जिल्हाधिकारी होण्याची इच्छा असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा त्यांनी दिली होती. त्यांचे शिक्षण बार्शी व पुणे येथे झाले आहेत.