योग्य दरासाठी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘रयतकडून’ दूध व बेदाण्याचा अभिषेक
पंढरपूर, दि.7- राज्यात दुधासह बेदाणा व अन्य कृषीमालाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने यात लक्ष घालावे याशिवाय शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखालील येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दूध व बेदाण्याचा अभिषेक घालण्यात आला.
गायीच्या दुधाला किमान 30 तर म्हशीच्या दुधाला 60 रूपये प्रतिलीटर दर मिळावा, बेदाण्याला 250 रूपये किलोचा दर मिळावा, शेतकर्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे व दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा, कांद्याला प्रतिक्विंटल 500 रूपये रूपये अनुदान द्यावे, खासगी बँका, फायनान्स कंपन्या व सावकारांच्या सक्तीच्या वसुलीवर बंदी आणावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आकाश डांगे, सोमनाथ भोसले, सूरज भोसले, सुनील पाटील, नंदू व्यवहारे, अण्णा मोरे उपस्थित होते.