रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ ; इंदापूरच्या महिला तहसिलदारांनी केले कोरोनाने दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार
सुरेश जकाते
इंदापूर, – तालुक्यातील भिगवण येथील 84 वर्षाचे जेष्ठ नागरिक तसेच माळवाडी नंबर 2 येथील 65 वर्षाच्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवास तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी मुखाग्नी दिला.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात 30 जुलै रोजी सकाळी भिगवण तर दुपारी माळवाडी राऊत वस्ती येथील कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना भिगवणच्या रुग्णाचा गुरूवारी रात्री तर माळवाडीनं.2 येथील रुग्णाचा आज 31 जुलै रोजी सकाळी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदनशिवे यांनी ही माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिली. मात्र त्यांनी मृतदेह आपल्या गावी नेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी इंदापूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
इंदापूर नगरपरिषद, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक गफूरभाई सय्यद, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने अंत्यविधी पार पाडण्यासाठी मदत करण्यात आली. येथे रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते सर्वश्रेष्ठ ठरले असून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभाव वृद्धिंगत झाला आहे. यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर्स, नगरपरिषद कर्मचारी तसेच गफूरभाई सय्यद यांचे विशेष कौतुक होत आहे.
नगरपरिषद कर्मचार्यांनी पीपीई किट घालून पार्थिव वैकुंठ स्मशान भूमीत आणले. 30 जुलै रोजी रात्री भिगवणच्या तर 31 जुलै रोजी सकाळी माळवाडी येथील मृत कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, अमोल खराडे, आकाश गावडे,सूरज मिसाळ ,अजय रजपूत, अजिंक्य ताटे यांनी विधी पार पाडण्यास मदत केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके उपस्थित होते.