रणजितसिंह मोहितेंच्या अचूक टायमिंगने विरोधक घायाळ
माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला तर हादराच बसला आहे परंतु मोहिते पाटील गटाविरोधात ज्या नेत्यांनी मोट बांधली होती त्यांना ही धक्का बसला आहे. गेली चार वर्षे भाजपाबरोबर राहून ही कमळापासून अंतर राखणार्यांना आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळ ठेवणार की लांबूनच नमस्कार करणार ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या राजकारणाला जोरदार हादरा बसला आहे. याचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागणार आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्यासमवेत राहिले आहेत. परंतु 2009 पासून मोहिते पाटील यांच्या खच्चीकरणाला पक्षाअंतर्गतच सुरूवात झाली. तरूण नेत्यांमधील स्पर्धा तीव्र झाली व यातून मतभेद वाढत गेले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी मिळू नये यासाठी खूप प्रयत्न झाले, पवार यांनाच मतदारसंघात येण्याचे साकडे घालण्यात आले. तसेच घडले व शरद पवार येथील खासदार बनले. 2014 ला मोदी लाट आली. त्यावेळी पवार यांनी जनतेचा कानोसा घेत विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली व ते प्रतिकूल परिस्थितीत विजयी झाले. परंतु 2019 ला पुन्हा शरद पवार यांनी माढ्यातून उभारण्याची तयारी केली. खासदार मोहिते पाटील यांनी मुत्सदेगिरी दाखवत पवार यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. संयम बाळगत परिस्थितीचा अंदाज घेतला.
मोहिते पाटील यांच्या शांततेत काय गुढ दडले आहे ? याचा अंदाज पवार यांना आला असावा व त्यांनी यामुळेच नंतर पार्थ पवारच्या मावळ उमेदवारी मुळे आपण माढ्यातून उभारणार नाही. असा पवित्रा घेतला व मोहिते पाटील यांना उमेदवारीची गळ घालण्यास सुरूवात केली. परंतु आता मोहिते पाटील गटाची सूत्र तरूणाईच्या हाती आली असून सततच्या खच्चीकरणाला कंटाळून त्यांनी सध्या देशात व राज्यात यशस्वी राजकीय घौडदौड करणार्या भाजपाला आपलेसे केले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व यापाठोपाठ जिल्हयातील त्यांचे समर्थक भाजपात येवू लागले आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपा प्रवेशाचे जे टायमिंग साधले आहे ते अत्यंत विचारपूर्वक आहे. वास्तविक पाहता विजयसिंह मोहिते पाटील यांचे कोणते ही काम भाजपाच्या केंद्रातील व राज्यातील सरकारने थांबविलेले नाही. उलट अनेक योजना मंजूर करून दिल्या आहेत. याच काळात जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांनी महाआघाडीची स्थापना करून भाजपा सरकारला जवळ केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली. यातील काही जणांनी हातात कमळ घेतले तर या आघाडीचे प्रमुख आहेत ते अधिकृत भाजपावासी झालेले नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे अपक्ष जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणूक रणधुमाळीत शिंदे यांच्याच नावाची चर्चा भाजपा व राष्ट्रवादीकडून होताना दिसत होती. त्यांची मुख्यमंत्र्यांची भेट झाली व त्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. शिंदे बंधू व शरद पवार यांचे चांगले संबंध असून सध्या तर संजय शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत.
तर दुसरीकडे महाआघाडीचे दुसरे नेते आमदार प्रशांत परिचारक हे महायुती पुरस्कृत विधानपरिषद सदस्य आहेत. ते जिल्ह्याचे आमदार असल्याने त्यांची भूमिका ही माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महत्वाची ठरणार आहे. परिचारक व मोहिते पाटील गटात 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर वितुष्ट आले आहे. 2014 ला प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी सोडली व महायुतीत सामील झाले. त्यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध घनिष्ठ आहेत. परिचारकांनी पंढरपूरच्या राजकारणात भाजपाला बरोबर घेतले असून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेत जागा दिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सोलापूरच्या लोकसभा निवडणूक तयारीच्या बैठकीस आमदार परिचारक उपस्थित होते. आता रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपात सहभागी झाल्यानंतर त्यांची भूमिका काय असणार ? हा मोठा प्रश्न आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक ही जोड जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच प्रसिध्द आहे. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना सहाय्य करत राजकारण करत आहेत. ज्या मोहिते पाटील गटाविरोधात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला बरोबर घेवून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे तेच मोहिते पाटील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला धरून भाजपात आल्याने अनेक नेत्यांची पंचाईत झाल्याचे सध्या तरी चित्र आहे.