राजकारणातील संत..सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्यावर शोककळा

(सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या आहेत.)

पंढरपूर- राज्याच्या राजकारणातील संत म्हणून ज्यांना ओळखले जाते ते पंढरपूरचे पाचवेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेले सुधाकरपंत परिचारक (वय 84) यांचे सोमवारी रात्री पुण्यात कोरोना आजाराशी लढताना निधन झाले. अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न असणार्‍या पंतांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना या आजाराची लागण झाल्यानंतर त्यांना पुण्यातील सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सोमवारी रात्रौ अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांचे निधन झाले. कालच त्यांचे नातू डॉ. प्रीतिश परिचारक यांनी फेसबुक पोस्ट टाकून पंतांच्या प्रकृतीची माहिती देत ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याचे भावनिक आवाहन केले होते. यामुळे परिचारकप्रेमींचे सारे लक्ष पुण्यातील हॉस्पिटलकडे होते.
मंगळवारी सकाळी सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाचे वृत्त समजले. त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांनी याविषयी पोस्ट केली असून यात त्यांनी याची माहिती दिली आहे. अंत्यसंस्कार पुण्यातील वैकुंठभूमीत मंगळवार 18 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमानुसार पंचवीस लोकांनाच यासाठी उपस्थित राहता येवू शकते. सर्वांनी धीर धरावा व संयम बाळगावा असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला आहे. त्यांना राजकारणातील संत , सहकारातील डॉक्टर या नावाने ओळखले जाते. जवळपास पन्नास वर्षाहून अधिक काळ ते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात व सहकारात काम करत होते. अखेरपर्यंत ते सक्रिय होते. सध्या ते श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते तर 2019 ची विधानसभा निवडणूक ही त्यांनी महायुतीकडून लढविली होती.
सुधाकरपंत परिचारक यांनी पंचवीस वर्षे विधानसभेत पंढरपूर मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 1985 ते 2009 पर्यंत ते आमदार होते. तर 1999 ते 2008 या कालावधीत ते राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा होता. पंतांनी ज्या संस्थेला हात लावला त्या संस्थेचा विकास झाला. श्रीपूरचा खासगी कारखाना विकत घेवून तो सहकारी केला व आज त्याच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा कायापालट पंतांनी केला. अनेक वर्षे या कारखान्याचे ते चेअरमन होते. पंढरपूर अर्बन को ऑप बँक त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रगती करत राहिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स ते मार्गदर्शक होते. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाबरोबर सहकारात त्यांनी काम केले. जिल्हा मध्यवर्ती बँक असो की दूध संघ अथवा अन्य संस्था येथे पंतांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तोट्यात गेलेले राज्य परिवहन महामंडळ तोट्यातून बाहेर काढण्याचे काम सुधाकरपंत परिचारक यांनी केले होते. पंढरपूर नगरपरिषद असो की पंचायत समिती पंतांच्या नेतृत्वाखाली परिचारक गटाने सदैव आपले वर्चस्व ठेवले आहे. पंढरपूर मतदारसंघासाठी पंतांनी आयुष्यभर काम केले आहे. अनेक विकास कामे येथे केली आहे.
पंढरपूर व आजुबाजूच्या तालुक्यात पंतांनी जे काम उभे केले आहे यामुळे हजारोंचे संसार उभे राहिले. सहकाराचा वापर त्यांनी जनतेच्या विकासासाठी केला व यामुळेच त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे व त्यांची भेट घेवून त्यांच्या पायावर डोके ठेवणार्‍यांची संख्या मोठी होती. त्यांनी कायम लोककल्याणाला महत्व दिले यामुळेच त्यांना लोक आदराने मोठे मालक या नावाने संबोधित करायचे. राज्याच्या व देशाच्या राजकारणातील बड्या नेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी व नंतर महायुतीबरोबर ते काम करत राहिले. वयाच्या 84 मध्ये त्यांचा उत्साह अपार होता. सतत ते कार्यमग्न दिसयाचे. आज ज्यांच्या जाण्याने केवळ पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारण व सहकारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!