राजकारणात अचूक टायमिंग साधणार्‍या घड्याळाचा आज 21 वा वर्धापन दिन

प्रशांत आराध्ये

ज्या काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यांच्याचसमवेत 2004 ते 2014 या कालावधीत दहा वर्षे केंद्रात शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात काम पाहिले तर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रसने 1999 ते 2014 पर्यंत 15 वर्षे सत्ता राखली. युपीएमधील एक महत्वाचे नेते म्हणून पवार यांचा देशभरातील राजकारणात दबदबा वाढला. पक्षाचे खासदार व आमदारांच्या संख्याबळापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय घेवून टायमिंग साधण्याचा त्यांचा हातखंड जबरदस्त आहे. 2019 ला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना हे सार्‍यांना पुन्हा पाहावयास मिळाले. शिवसेनेला व काँग्रेसला एकाच सरकारमध्ये आणण्याचा चमत्कार ही पवार यांनीच घडवून आणला आहे. राष्ट्रवादीला स्थापन होवून 21 वर्षे आज होत आहेत. यापैकी साडेपंधरा वर्षे राज्यात तर 10 वर्षे केंद्रात या पक्षाने सत्तेत सहभाग नोंदविला आहे.

10 जून 1999 ला शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत नवा पक्ष राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना केली. यानंतर त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी राज्यात पुन्हा शिवसेना व भाजपा युतीची सत्ता येत नसल्याचे पाहात काँग्रेसबरोबर आघाडी केली व महाराष्ट्रात तब्बल 15 वर्षे सत्ता राखली. यानंतर 2004 ला केंद्रातून भाजपाचे वायपेयी सरकार गेल्यावर काँग्रेस प्रणित युपीएची सत्ता आली व पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2014 पर्यंत ते युपीएच्या केंद्र सरकारमध्ये कृषी सारख्या महत्वाच्या पदावर कार्यरत राहिले. दहा वर्षे केंद्रीयमंत्री राहिले. याच काळात त्यांनी देशात आपल्या कामाची अशी छाप उमटविली की त्यांचे सर्वपक्षीय अनेक नेते त्यांचे मित्र झाले आहेत. महाराष्ट्रात 2014 च्या विधानसभेला सर्वच पक्ष आघाडी व युती न करता लढले, भाजपा मोठा पक्ष म्हणून पुढे आला मात्र बहुमत नव्हते अशा वेळी निकाल लागता क्षणी पवार यांनी न मागताच स्थिर सरकारसाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सत्तास्थापनेसाठी बाहेरून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आणि हे पाहताच शिवसेना आपसूकच भाजपासोबत गेली. तरी ही फडणवीस सरकारला सुरूवातीला सहकार्य करणारे अदृश्य हात कोणते होते हे सार्‍या महाराष्ट्राला कळाले. यानंतर 2019 ला राज्यात भाजपा व शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना ही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना नाराज असल्याचे राज्याने पाहिले व अचूक टायमिंग साधत पवार यांनी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. पुतणे व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 78 तासाचे बंड ही शमविले आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविले व त्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळविला हे विशेष आहे.

ज्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादीची स्थापना झाली तोच काँग्रेस पक्ष आता शरद पवार यांचा सल्ला अनेक बाबतीत मानत असल्याचे चित्र आहे. देशाच्या व राज्याच्या राजकारणा काँग्रेसस ही पवार यांचा योग्य तो सन्मान राखत असल्याचे स्पष्ट दिसते. परंतु त्याचवेळी अन्य पक्षात ही त्यांचे खूप मित्र आहेत. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना गुजरात भुकंपाच्या वेळी शरद पवार यांच्याकडे आपत्ती निवारण विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. किल्लारी भुकंपाच्यावेळी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते व त्यांना त्या स्थितीत कशा पध्दतीने निर्णय घ्यायचे याचा अनुभव होता. याचा उपयोग तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी करून घेतला होता. आज ही देशाच्या राजकारणातील महत्वाचे स्थान असणार्‍या बहुतांश सर्वच नेत्यांनी शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे नेते मुलायमसिंग यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यासह अनेक नेत्यांची नावे उदाहरणादाखल सांगता येवू शकतात. महाराष्ट्रात तर त्यांनी ज्या शिवसेने विरोधात अनेक वर्ष काम केले त्यांनाच बरोबर घेवून सत्ता स्थापन करून दाखविली, व राज्याच्या राजकारणात आपणच किंगमेकर आहोत याची प्रचिती भाजपाला व त्यांच्या राज्यातील नेतृत्वाला दाखवून दिली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वयाच्या 80 व्या वर्षी ही जो प्रचार केला त्यामुळेच दोन्ही काँग्रेस पक्षांना शंभरच्या आसपास जागा जिंकत्या आल्या व आज महाराष्ट्रात भाजपाला धक्का देत तीन पक्षांची का होईना पण सत्ता स्थापन करता आली.
राष्ट्रवादी काँंग्रेसचा आज 21 वा वर्धापन दिसून याची स्थापन करणारे खासदार शरद पवार हे सध्या जरी ऐंशी वर्षाचे झाले असले तरी पक्षाच्या वयाप्रमाणे (21 वर्षे) त्यांचे काम तरूणाईसारखेच आहे. आज पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असताना पवार साहेब चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व तेथील जनतेला धीर देण्यासाठी कोकणात पोहोचले आहेत. संकटाच्या काळात शरद पवार हे नेहमीच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात हे आजवर सार्‍यांनीच पाहिले आहे. जेंव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत होते तेंव्हा अतिवृष्टी झाली आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह अन्यत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी पवार यांनी या भागाच्या दौर्‍याला प्राधान्य दिले व शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर ही त्यांनी तातडीने पाणीटंचाईग्रस्त भागाचा दौरा करण्यास प्राधान्य दिले होते. याच काळात ते सांगोला दौर्‍यावर ही आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे समीकरण आहे. पवार साहेबांनी आजवर 50 वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात काम केले आहे. राजकारण, सहकार, समाजकारण, कृषी, क्रीडा यासह विविध क्षेत्रात त्यांनी केलेेले काम उल्लेखनीय तर आहेच पण ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. लोकात मिसणारा नेता म्हणून ते प्रसिध्द आहेत. सर्वसामान्य माणसांशी त्यांनी तटू न दिलेली नाळ, अनेक विषयांचा सखोल अभ्यास, अपार कष्टाची तयारी, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा हातखंडा हे त्यांचे गुण वाखण्ण्यासारखे आहेत. आज जरी ते 80 वर्षाचे असले तरी त्यांचा कामाचा उत्साह हा तरूणांना लाजविणारा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!