राजकीय कल्याणासाठी काळेंचे ही लक्ष पंढरपूर-मंगळवेढ्यावर !
पंढरपूर– माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांना आव्हानं देण्याच्या तयारीत असणारे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे लक्ष पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघावर देखील असल्याची चर्चा आहे. पंढरपूर शहर भाजपाच्या बैठकीस त्यांनी हजेरी लावली आणि येथून भाजपाच्या अधिकृत उमेदवारालाच तिकिट मिळावे अशा ठरावास ही त्यांनी पाठिंबा दिला आहे. येथून भाजपाचा उमेदवार आणखी ठरला नसून अनेकजण यासाठी इच्छुक आहेत.काळे हे लोकसभा निवडणुकीत भाजपात आले व त्यांच्या प्रवेशाला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाडीकुरोलीत आले होते. काळे यांचे निवासस्थान पंढरपूर शहरात असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे माढा मतदारसंघात आहे. त्यांचे मुळ गाव वाडीकुरोली आहे. गतनिवडणुकीपासून ते माढ्यात विधानसभेला नशीब आजमावित आहेत. विठ्ठल परिवारातील दिग्गज नेते असणार्या काळे यांचे लक्ष पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात ही आधुनमधून असते. या मतदारसंघात तुल्यबळ नेत्यांची फौज असून येथून लढण्याची तयारी करणार्यांमध्ये परिचारक गटातील सुधाकरपंत परिचारक व त्यांचे दोन पुतणे आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्यापैकी एकजण कोणी असू असते. विद्यमान काँगे्रस आमदार भारत भालके हे पुन्हा लढण्यास सज्ज आहेत व ते कोणत्या पक्षातून हे मात्र अद्याप निश्चित नाही. ते ही भाजपाच्या वाटेवर असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याच बरोबर उद्योगपती समाधान आवताडे यांचे नाव ही आघाडीवर आहे. भाजपात आलेले डॉ. बी.पी.रोंगे हे देखील उमेदवारी मागतील असे दिसत आहे.काल भाजप शहरची बैठक पंढरीत झाली यास कल्याणराव काळे उपस्थित राहिले होते व त्यांनी येथे मनोगत ही व्यक्त केले. काळे हे माढ्यातून लढण्याची तयारी करत असले तरी तेथे ही खूप भाऊगर्दी असून तो मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला आहे. तर सध्या शिवसेनेने ज्या सावंत बंधूंच्या हाती जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. त्या प्रा.तानाजी सावंतांकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे व माढ्यात त्यांनी शिंदे बंधूंच्या विरोधात सर्वांची एकजूट करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे माढ्याच्या स्थानिक राजकारणात महायुतीचा उमेदवार म्हणून काळेंना कितपत स्वीकारले जाईल याबाबत शंका उपस्थित होत आहे. जर भाजपा व शिवसेना जर स्वतंत्र लढले तर मात्र त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यास्तव ते कदाचित पंढरपूर- मंगळवेढ्याकडे आपला मोर्चा वळवू शकतील अशी चर्चा आहे.