मंगळवेढा – महाराष्ट्रात सध्या अनेक विचित्र घडामोडी घडत आहेत, त्यामुळे राज्यातील परिस्थिती बिघडत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , अनुसूचित जाती जमातीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव,अण्णाभाऊ साठे महामंडळ माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटक सचिव दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे,संचालक सचिन शिवशरण,शहराध्यक्ष गोपाळ भगरे उपस्थित होते.
आठवले पुढे बोलताना म्हणाले , मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील सर्वांचा पाठिंबा मिळवून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी आपण जीवाचे रान करून प्रचार केला पाहिजे. समाधान आवताडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत अनेक गरीब, होतकरू, गरजू नागरिकांना मदत केली आहे.त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. हे या मतदारसंघासाठी मोठ्या फायद्याची गोष्ट आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. पण हे महाविकास आघाडी सरकार अपयशु ठरले आहे, ही शोकांतिका आहे. अशा या सरकारला जनतेने घरी बसवले पाहिजे.
सचिन वाझेचे बोलावता धनी हे सरकारमधील बडे मंत्री आहेत. या वसुली सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव जगात बदनाम होत असल्याचे ते म्हणाले.
उमेदवार समाधान आवताडे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ही निवडणूक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत.आता सुधारणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या आहेत. कोरोनाच्या काळात महिला वर्गाला,शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.