पंढरपूर, दि.5- मागील दोन महिन्यापासून राज्यातील भाजपातील साखर कारखानदार नेत्यांची सतत दिल्ली वारी सुरू असून सोमवार 5 ऑक्टोंबरला देशाचे गृहमंत्री अमित शहा व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेण्यात आली. महाराष्ट्रात साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणीत असून यासाठी मदत करण्याचे आश्वासन शहा व प्रधान यांनी दिले आहे.
मागील वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात अनेकांचा प्रवेश घडवून आणला होता. अपेक्षेप्रमाणे लोकसभेला केंद्रात मोदी सरकार विजयी झाले. मात्र विधानसभेला भाजपा व शिवसेना युतीला यश मिळून ही शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत गेल्याने येथे भाजपाला विरोधात बसावे लागले आहे.
येथील दोन्ही काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या साखर कारखानदारीतील नेत्यांनी आता अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे. यासाठी यापूर्वी दोन वेळा नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाल्या आहेत. गत दौऱ्यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह पंढरपूरचे कल्याणराव काळे शिष्टमंडळात होते. आज सोमवारी 5 रोजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली व साखर कारखानदारीसमोरील प्रश्न मांडले. यातून लवकरच मार्ग काढला जार्इल व कारखान्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून मिळाल्याचे सांगण्यात आले. गृहमंत्री अमित शहा हेच साखर कारखानदारीला मदत करू शकणाऱ्या विभागाचे काम पाहतात.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या इथेनाॅल संबंधातील अडीअडचणी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅसक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समवेत चर्चा झाली. इथेनाॅल संदर्भातील सर्व अडीअडचणी समजावून घेऊन लवकरच या संदर्भात नवीन धोरण तयार करून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचं आश्वासन त्यांनी आमदार मोहिते पाटील व आ. राहुल कुल यांना दिले.