राज्यात कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश

*राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ*

मुंबई, दि. १६: राज्यात कोरोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत ४८ हजार १९८ जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर २९१६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के जणांना लक्षणे दिसत नसून २५ टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे. असे असले तरी कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा सकारात्मक प्रतिसाद, आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे २९५ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात असून समाजातूनही या रुग्णांचे स्वागत केले जात आहे.
मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगतानाच कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये सहा महिन्याच्या चिमुकल्यापासून ते ८३ वर्षांच्या आजीबाईंचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. कोरोनाला हरविणाऱ्या सहा महिन्याच्या कल्याण येथील चिमुकल्याच्या आईशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्याचे अभिनंदनही केले.
९ मार्चला राज्यातील पहिले दोन कोरोना रुग्ण आढळून आले. पुण्यातील दाम्पत्य असलेले हे रुग्ण १४ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर २३ मार्चला बरे होऊन घरी गेले. राज्यातील पहिले कोरोनामुक्त रुग्ण म्हणूनही त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील १६६, ठाणे मनपा ६, ठाणे ग्रामीण ३, कल्याण डोंबिवली १४, मीरा भाईंदर २, नवी मुंबई ९, पनवेल ३, उल्हासनगर १, वसई विरार २, नागपूर ११, पुणे महापालिका परिसर २७, पिंपरी चिंचवड १२, पुणे ग्रामीण ४, अहमदनगर ग्रामीण १, अहमदनगर महापालिका क्षेत्र २, नाशिक ग्रामीण १, रत्नागिरी १, सिंधुदुर्ग १, सांगली २५, सातारा १, यवतमाळ ३ आणि गोंदिया १ असे एकूण २९५ रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावर युद्ध जिंकल्याची भावना दिसून येत असून ठिकठिकाणी या रुग्णांना घरी जातांना टाळ्यांच्या गजरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी निरोप देताना दिसत आहेत. कल्याण मधील सहा महिन्यांचा चिमुकल्याला रुग्णालयातून जेव्हा घरी आणले तेव्हा तो राहत असलेल्या संपूर्ण सोसायटीच्या सदस्यांनी गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना बाधीत रुग्ण त्यांचे कुटुंबिय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!