राज्यात तब्बल..२ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

नाशिक – राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने महत्वकांक्षी शिवभोजन योजना सुरु केली. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल २ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्वकांक्षी योजना सुरु केली. राज्यात २६ जानेवारी शिवभोजन या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असून पाच रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णयास मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कष्टकरी,असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिल पासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे.

शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१ नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार २५७, ३३ लाख ८४ हजार ०४०, ३० लाख ९६ हजार २३२ इतक्या लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात ३० लाख ३ हजार ४७४, ऑगस्ट महिन्यात ३० लाख ६० हजार ३१९, सप्टेंबर महिन्यात ३० लाख ५९ हजार १७६ आणि दिनांक ७ ऑक्टोबर पर्यंत ७ लाख ९ हजार १७६ अशा एकूण १ कोटी ९९ लाख ३७ हजार ४९२ गरीब आणि गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून आज शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेचा असाच वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, असेही राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!