राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
*⭕कोरोना उपचाराची सज्जता : १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत*
मुंबई, दि. २७: राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किट्स तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी- १ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- २ मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी ३ मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो. या तिन्ही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फीवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसांठी श्रेणी १ मध्ये उपचार सुविधा असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी श्रेणी २ मध्ये तर ज्यांना लक्षणे नाहीत अशांसाठी श्रेणी ३ मध्ये उपचार केला जातो. राज्यात श्रेणी १ चे २४६ अधिकृत कोरोना रुग्णालये असून त्यामध्ये एकूण ३२ हजार ८६१ विलगीकरण खाटा आहेत त्यात अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.
श्रेणी २ मधील ५१७ अधिकृत कोरोना रुग्णालय व निगा केंद्र कार्यरत असून त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटा मिळून सुमारे ३१ हजार विलगीकरण खाटा आहेत. श्रेणी ३ मधील ९१४ कोरोना रुग्ण निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात १ लाख २० हजार ६११ विलगीकरण खाटा आहेत. अशा प्रकारे राज्यात एकूण १६७७ रुग्णालये तीनही श्रेणीतील असून त्यात १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटा आहेत. त्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ६२ हजार ६४० तर कोरोनाबाधितांसाठी १ लाख १३ हजार ७०७ विलगीकरण खाटांचा समावेश आहे. या तिन्ही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई, किटस् तसेच व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
००००